गुजराती रंगभूमीवर मराठीचा झेंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्षितिज झारापकर,[email protected]

मंगेश कदम. मराठी रंगभूमीवरील गुणी कलाकार. कलेला भाषेचे बंधन नसते. हे तत्त्व घेऊन आता गुजराती रंगभूमीवर दुसरे नाटक दिग्दर्शित करून तेथेही मराठीचा झेंडा प्रस्थापित करतोय.

मराठीतून नाटकं गुजरातीत जातात असा शिरस्ता होता.

हल्ली तर तिथून नाटकं आपल्याकडे येऊ लागली आहेत. ‘कोडमंत्र’ हे उत्तम उदाहरण आहे. कलाप्रांतात अशी निर्भेळ देवाणघेवाण चालूच असते आणि असायला हवी. पुलंचं ‘ती फुलराणी’देखील गुजराती ‘संतो रंगीली’चा भावनुवाद आहे. बर्नार्ड शॉच्या ‘पिगमॅलियन’चा नव्हे. आपलीदेखील खूप नाटकं गुजरातीत भाषांतरीत होऊन तिथेही गाजली आहेत. नाटक नाटक असतं. त्यातल्या भावना आपल्या असल्या की मग भाषेचा अडसर नसतो. हिंदुस्थानी भावूकता देशाच्या कोणत्याही भाषेत सारखीच असते.

पण एका वेगळ्या भाषेत अभिनय किंवा दिग्दर्शन करताना काही अडचण काही वेगळेपण जाणतं का?

आपण मुंबईत राहतो हा एक मोठा फायदा आहे. आपल्याला व्यक्त व्हायला इंग्रजी अणि हिंदीची मदत मिळते. त्यामुळे दिग्दर्शक म्हणून समजवताना अडचण काहीच येणार नाही. नाटकाच्या स्ट्रक्चरमध्ये थोडा फरक होतो. नेपथ्याचे आडाखे बदलतात. पात्रांच्या प्रतिक्रिया वेगळ्या असू शकतात. हे सगळे बदल आपल्यालाच अधिक प्रगल्भ बनवतात. वेगळ्या पद्धतीने नाटकाचा विचार करण्यातही एक गंमत असते. एक दिग्दर्शक म्हणून बऱयाचदा ते आव्हानात्मकही असतं. एकदा भाषा तोंडात आणि मुख्य म्हणजे डोक्यात बसली की अभिनयदेखील जमतो.

दोन नाटय़क्षेत्रात फरक काय आणि किती जाणवतो?

फरक असा नाहीच. मुळात दोन्ही रंगभूमी हिंदुस्थानीच असल्याने पाया सारखाच आहे. प्रेक्षकांची विचार करण्याची पद्धत थोडी वेगळी असेल इतकंच. आपला तमाशा अणि त्यांचा भवई हा फॉर्म तसा समकालीनच. दोन्ही नाटय़क्षेत्रात नंतर पाश्चात्य संदर्भ आला आणि नाटक तयार झालं. मराठी नाटय़क्षेत्र मुंबईमुळे जरा लवकर प्रगल्भ झालं इतकंच.

 ‘शातीर’विषयी थोडं?

 ‘शातीर हे स्नेहा देसाई लिखित नवं कोरं गजराती नाटक आहे. यात हिंदी चित्रपट व मलिकांमधून लोकप्रिय असलेले ‘ये क्या हो रहा है’ फेम टिकू तलसानिया आहेत आणि स्वतः स्नेहा देसाईही आहेत.

आपले मराठी रंगकर्मीही गुजरातीत खूप दिसतात. मनोज जोशी, रोहिणी हट्टंगडी, तुम्ही?

 कलेला प्रांत नसतो हे खरं. मराठी, गुजराती, तमिळ, मल्ल्याळी, बंगाली कलाकार असं नसतं. किशोर कुमार मराठीत गातो आणि लताबाई बंगाली गाणी म्हणतात. रजनीकांत तर एक वेगळं संस्थानच बनतो. आम्ही सगळे कलाकार आहोत. जिथे आवडेल तेथे काम करणार. गुजराती रंगभूमीने आपल्याला कित्येक मातब्बर कलाकार दिले. परेश रावल, शाली शेट्टी, जमनादास मजेथिया हे सगळे इथूनच आले.

मराठी रंगभूमीची दीडशे वर्षांची परंपरा आहे. त्यामानाने गुजराती रंगभूमी तशी नवीन आहे असा सामान्य समज आहे?

दोन्ही रंगभूमी समकालीन आहेत. 1850 साली ग्रीक कॉमेडी ‘प्लुटस’वर बेतलेलं ‘लक्ष्मी’ हे गुजराती नाटक झालं होतं. 1853 साली ग्रँट रोड थिएटरमध्ये पारशी मंडळींनी गुजराती नाटक सादर केलं होतं. पण आपल्याकडे जसे सावरकर, खाडिलकर वगैरे लेखक झाले आणि मराठी रंगभूमी समृद्ध होत गेली तशी रणछोडदास दवे वगैरे मंडळी जरा उशीरा गुजरातीत आली. पण आज मनोज शहा, मनोज जोशी वगैरे लोक गुजराती थिएटर सांभाळून आहेत.

आपण कितीही म्हटलं की भावना समान असतात तरी प्रत्येक भाषा वेगळी असतेच ना? मग त्यात सादर होणारं नाटकही तसं वेगळं असणार?

 मुंबई हे नाटकांचं माहेरघर म्हणायला हवं. इथे अगदी 1920 पासून नाटय़चळवळ दिमाखात सुरु आहे. त्यात प्रामुख्याने मराठी आणि हिंदी, इंग्रजी व गुजराती नाटय़सृष्टीचा समावेश आहे. हायवेवर वांद्रय़ाचा उड्डाण पूल उतरताना जो दिशाफलक आहे तेथेच अहमदाबाद लिहिलंय. यावरुन गुजराती इथे किती मिसळली आहे हे कळतं. प्रत्येक भाषेचा पोत निराळा असणारच. पण मुंबईमुळे एकाच वेळी अनेक भाषा आत्मसात नसल्या तरी ओळखीच्या नक्कीच असतात. म्हणूनच मराठीतले कलाकार अगदी सहजपणे इतर भाषांमध्ये काम करु शकतात.