हळव्या मनाचा कॉन्ट्रॅक्ट किलर, मुलांकडे पाहून आईला मारण्यास दिला नकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । शिवमोग्गा

सुपारी घेऊन अनेक गुन्हेगार समोरच्या व्यक्तीचा निर्घुण खून करतात. अशा कॉन्ट्रॅक्ट किलर्सना फक्त पैसा महत्त्वाचा असतो. पण कर्नाटकाच्या शिवमोग्गामध्ये एक वेगळीच घटना समोर आली आहे. एका पतीने आपल्या पत्नीला मारण्यासाठी एका कॉन्ट्रॅक्ट किलरला सुपारी दिली. पण त्या महिलेच्या दोन मुलांकडे पाहून त्याने हे काम केलेच नाही.

रविंद्र गिरी हे मुख्य शिपाई पदावर पोलिसांत कार्यरत आहेत. त्यांचे एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध होते. यामुळे गिरी आणि त्यांची पत्नी अनिता यांच्यात वाद होत होते. रविंद्र यांनी महिलेसोबत असलेले संबंध तोडण्यास पत्नीला नकार दिला. त्यामुळे गिरी यांनी आपली पत्नी अनिता हिची सुपारी दिली. तिच्या मृत्यूनंतर प्रेयसीसोबत लग्न करण्याचे स्वप्न रविंद्र पाहत होते. गिरी यांनी फिरोजला अनीताची सुपारी दिली होती. फिरोज आपल्या दोन साथीदारांसह अनिताला मारण्यास तिच्या घरी पोहोचला. साथीदाराने बंदूक अनितावर रोखली पण गोळी घालण्यास फिरोजने त्याला रोखले. अनिताचा जर मृत्यू झाला तर तिच्या दोन मुलांकडे कोण बघणार असा प्रश्न त्याला पडला आणि त्याने हे काम केलेच नाही.

रविंद्र गिरी आणि अनीता यांचे ९ वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्यांना एक 8 वर्षाचा मुलगा आणि 7 वर्षाची मुलगी आहे. रविंद्र यांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे दोघांमध्ये वाद विकोपाला गेले होते. तेव्हा गिरी यांनी अनीताचा काटा काढण्याचे ठरवले. पण कॉन्ट्रॅक्ट किलरच्या हळव्या मनामुळे त्यांची योजना फसली

भद्रावती पोलिसांना अनिताचे फिरोजसोबतचे फोटो मिळाले. फिरोजवर आधी काही गुन्हे दाखल होते, त्यासाठी त्याला तुरुंगाची हवाही खावी लागली होती. पोलिसांनी फिरोजला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता हा प्रकार उघडकीस आला. अनिताला मारण्यासाठी रविंद्रने चार लाख रुपये देण्याचे वचन दिले होते अशी कबुली फिरोजने दिली. पण अनिताला मारल्यावर तिच्या दोन लहान मुलांचे काय होईल असा प्रश्न आपल्याला पडला म्हणून तिच्यावर गोळी न झाडल्याचे त्याने सांगितले.

या प्रकरणी पोलिसांनी फिरोज आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. पण अनिताने आपल्या पतीविरोधात तक्रार नोंदवण्यास नकार दिला आहे, तसेच आमच्या दोघांत कुठलाच वाद नसल्याचेही तिने सांगितले. पण पोलिसांनी स्वतःहून रविंद्र गिरीवर गुन्हा दाखल केला आहे.