
सामना प्रतिनिधी । मुंबई
कुठलीही सुशिक्षित डबल ग्रॅज्युएट असलेली महिला आपल्यावर झालेला अन्याय 17 वर्षे सहनच कसा करू शकते? सदर महिलेने याआधीही आपल्याविरोधात खोटय़ा तक्रारी दाखल केल्या होत्या, मात्र पोलिसांना त्यात कोणतेही तथ्य आढळले नाही. आपली राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा हा डाव असून आपल्यावरील आरोप धादांत खोटे असल्याचा खुलासा मुंबई म्हाडाचे अध्यक्ष मधू चव्हाण यांनी केला आहे.
एका शैक्षणिक संस्थेतील महिलेने केलेल्या बलात्काराच्या तक्रारीची दखल घेऊन हायकोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार भाजपच्या मधू चव्हाण यांच्या विरोधात चिपळूण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना मधू चव्हाण यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. यामागे जो कोणी व्यक्ती आहे त्याचे नावही आपण योग्य वेळी जाहीर करू असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.
मधू चव्हाण यांनी राजीनामा द्यावा – नीलम गोऱ्हे
भाजपचे आमदार राम कदम यांनी महिलांविषयी केलेले वक्तव्य, त्याचप्रमाणे मधू चव्हाण यांच्याविरोधात दाखल झालेला गुन्हा याची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायला हवी. जो न्याय आमदार एकनाथ खडसे यांना लावला तोच न्याय या दोघांनाही लावावा. मधू चव्हाण यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी शिवसेना उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोऱहे यांनी केली आहे.



























































