
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबईतील फेरीवाल्यांच्या जागा निश्चितीसाठी पालिकेचे धोरण अंतिम टप्प्यात आले असून अधिकृत परवान्यासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत अधिवास दाखल सादर करावा लागणार आहे. यासाठी पालिकेकडे अर्ज केलेल्या 99 हजार 435 फेरीवाल्यांना अधिवास दाखला सादर करण्यासाठी रजिस्टर पोस्टने नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र यातील तब्बल 25 ते 30 हजार लेटर परत आल्याने पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या फेरीकाला धोरणानुसार पालिकेने 2014 मध्ये अर्ज मागकल्यानंतर 99,435 जणांनी परवान्याची मागणी केली होती. मात्र त्यानंतर अपेक्षित कार्यवाही झाली नसल्याने फेरीवाल्यांच्या परवान्यांचा प्रश्न गेली चार वर्षे रखडला आहे. मात्र गेल्या वर्षी एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर फेरीवाल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून पालिका प्रशासनाकडून फेरीवाला झोन तयार करून अधिकृत फेरीवाल्यांना रीतसर परवाना देण्याचे धोरण आखण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात फेरीवाल्यांसाठी 85 हजार 891 जागा निश्चित केल्या आहेत. यावर मुंबईकरांना केलेल्या आवाहनानंतर 1660 हरकती, सूचना आल्या आहेत. 2014 च्या सर्वेक्षणानुसार जागा, अर्जांची तपासणी सुरू असून ती अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, पालिकेचा ‘आर’ विभाग, जी-साऊथ, जी-नॉर्थ विभागात फेरीवाल्यांसाठी ‘पिच’ बनवण्याचे काम सुरूदेखील करण्यात आले आहे.
–फेरीवाला परवाने देताना कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये आणि परवाना मिळाल्यानंतर गैरफायदा घेतला जाऊ नये यासाठी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सर्व माहिती एकत्र करण्यात आली आहे.
–पालिकेच्या फेरीवाला धोरणात मंदिर आणि धार्मिक स्थळांपासून 100 मीटर परिसरात फेरीवाल्यांना परवाना देण्यात येणार नाही. या परिसरात फक्त पूजेचे साहित्य विकण्यासाठीचा परवाना देण्यात येईल.
अधिवास दाखला देणाऱया अर्जदारांना पालिकेकडून फेरीवाला परवाना देण्यात येणार आहे. यासाठी पालिकेकडून रजिस्टर पोस्टाने नोटीसही पाठवण्यात आली, मात्र यातील अनेक लेटर परत आल्याने अधिवास दाखला सादर करण्यासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
-निधी चौधरी, उपायुक्त (विशेष)



























































