
सामना प्रतिनिधी । मुंबई
सांताक्रुझमधील झोपडय़ांवर बेकायदेशीरपणे बुलडोझर चालविणाऱ्या म्हाडा प्रशानाला हायकोर्टाने धारेवर धरले. रहिवाशांना कोणतीही नोटीस न बजावता झोपडय़ांवर कारवाई कशी करता, असे खडसावत हायकोर्टाने म्हाडाला फैलावर घेतले. 3 ऑक्टोबरपर्यंत या झोपडय़ांवर कोणतीही कारवाई करू नये असे बजावत न्यायालयाने कारवाईवर स्थगिती आणली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे झोपडीधारकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.
वाकोला येथील डवरी नगर येथे पाच हजार झोपडीधारक असून म्हाडाने त्यांना कोणतीही नोटीस न बजावता कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईविरोधात रहिवाशांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत ऍड. विनोद सांगवीकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती एम. एस. सोनक यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने ऍड. सांगवीकर यांनी कोर्टात रहिवाशांची भूमिका मांडली.
























































