प्रख्यात हार्मोनियम वादक पद्मश्री तुळशीदास बोरकर यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

प्रख्यात हार्मोनियम वादक पद्मश्री पंडित तुळशीदास बोरकर यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच आज सकाळी सकाळी १०.२०च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बोटातल्या जादुई स्पर्शाने हार्मोनियम वादनाला एका अलौकिक उंचीवर नेणारा अवलिया हरपल्याची भावना कलावर्तुळात व्यक्त होत आहे.

पंडित तुळशीदास बोरकर यांना काही महिन्यांपूर्वी हार्नियाचा त्रास झाला होता. त्यावर शस्त्रक्रिया होऊन ते घरीही परतले होते. परंतु पंधरा दिवसांपूर्वी त्यांना श्वसनाचा त्रास व्हायला लागला. त्यामुळं त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना टीबीचा विकार जडल्याचं निदान डॉक्टरांनी केलं होतं. त्या आजारावरही उपचार सुरू होते. मात्र, वयोमानामुळं त्याला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. आज अखेर त्यांचं निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व दोन मुलगे असा परिवार आहे.

कलाकार आणि साहित्यिकांची भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोव्यातल्या बोरी या गावात १९३४ साली त्यांचा जन्म झाला. त्यांच्या लहानपणीच त्यांचे कुटुंब गोवा सोडून पुण्यात स्थायिक झालं. त्यावेळी ते आपले गुरू मधुकर पेडणेकर यांच्याकडे मुंबईला ते ये-जा करत असत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत उस्ताद आमीर खान, पंडित भीमसेन जोशी, मल्लिकार्जुन मन्सूर, किशोरी आमोणकर, जितेंद्र अभिषेकी, छोटा गंधर्व आदी दिग्गजांना हार्मोनियमची साथ केली होती.

बोरकर यांनी आपल्या हार्मोनियम वादनानं केवळ शास्त्रीय संगीताच्या रसिकांना आनंदच दिला नाही, तर ते अखेरपर्यंत ज्ञानदान करत राहिले. त्यांनी अनेक शिष्योत्तम घडवले. बोरकर यांच्याकडून हार्मोनियम वादनाचे तंत्र शिकलेले अनेक शिष्य आज स्वतंत्रपणे शास्त्रीय संगीताचा प्रसार करत आहेत. शास्त्रीय संगीतातील त्यांच्या योगदानाबद्दल २०१६ साली त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.

summary- harmonium player tulsidas borkar passes away