जीवनदायी…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. पुष्कर शिकारखाने

आज जागतिक रक्तदिन. रक्त आपल्या शरीरातील महत्त्वाचा घटक. जाणून घेऊया रक्ताविषयी सविस्तर…

शरीरात आवश्यक असलेल्या सर्वच घटकांमध्ये रक्त हा एक महत्त्वाचा घटक आहे, पण या रक्तातील हिमोग्लोबीनला खरं तर जास्त महत्त्व आहे. श्वासामार्फत घेणारा ऑक्सिजन शरीरात इंधनाच्या ज्वलनाचं काम करतो. यातून जी ऊर्जा मिळते त्यावर शरीर चालतं. हा ऑक्सिजन शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवण्याचं काम रक्त करतं. त्यामुळे रक्त हे खूप गरजेचं असतं. रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. ते कमी होण्याला रक्तक्षय किंवा ऑनिमिया म्हटलं जातं. अशावेळी माणसाला थकवा येणं, निरुत्साही वाटणं किंवा त्याची कार्यक्षमता कमी होणं ही लक्षणं दिसू लागतात.

हिमोग्लोबिन कमी होण्यासाठी शरीरात लोहाचं प्रमाण कमी होणं हेही एक कारण होऊ शकतं. रक्तक्षय बहुतांश स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. त्यांच्या आहारात लोहाचे प्रमाण हवे तेवढे नसेल तरी त्यांना रक्तक्षय होऊ शकतो. यामुळे स्त्रियांना प्रचंड थकवा येऊ शकतो. अशा स्त्रियांनी आपल्या आहारात लोहाचं प्रमाण जास्त ठेवलं पाहिजे. पुरुषांच्या बाबतीतही रक्तक्षय बऱ्याचदा दिसू शकतो. त्यांच्यात जर असा ऑनिमिया सापडला, तर त्यांच्या आतड्यांमध्ये काही रक्तस्राव होत नाही ना हे पाहणे आवश्यक ठरते. शरीरातील रक्तातून हिमोग्लोबिन कमी होण्याचं आणखी एक कारण म्हणजे बी12 या जीवनसत्त्वाचं प्रमाण घटणं… जे लोक शुद्ध शाकाहारच घेतात म्हणजे दूधही फारसे घेत नाहीत त्यांच्यात आणि आतड्यांचे दोष असणाऱ्या रुग्णांमध्ये या जीवनसत्त्वाचे प्रमाण कमी असण्याची शक्यता असते.

पांढऱ्या पेशी महत्त्वाच्या…

रक्तात हिमोग्लोबिनप्रमाणेच पांढऱ्या पेशीही खूप महत्त्वाच्या ठरतात. कारण या पांढऱ्या पेशी बाहेरून येणाऱ्या जंतूंशी लढून शरीर सुदृढ ठेवण्याचं काम करत असतात. त्या पेशींचं प्रमाणही पुरेसं राखण्यासाठी आपलं आरोग्य चांगलं असलं पाहिजे. या पेशींचं प्रमाण खूप वाढलं किंवा अगदीच कमी झालं तर तेही रोगाचं लक्षण असतं. रक्तातील प्लेटलेट्स कमी झाल्या तर रक्त गोठण्याच्या क्रियेवर परिणाम होतो. तसं झालं तर रुग्णांमध्ये रक्तस्राव होऊ शकतो. मलेरिया, डेंग्यू या आजारांमध्ये रक्तातील प्लेटलेट्सची संख्या कमी होते, पण या आजारांवर योग्य उपचार झाले की, या प्लेटलेट्सची संख्या पूर्ववत करता येऊ शकते. रक्ताच्या कर्करोगामध्ये रक्तातील पांढऱ्या पेशींचं प्रमाण अमर्याद वाढतं. त्यामुळे बाकीच्या पेशींवर त्याचा दुष्परिणाम होतो. ते जीवघेणं ठरू शकतं, पण त्यावर अलीकडे बोन मॅरो ट्रान्सप्लॅन्ट किंवा केमोथेरपीच्या उपचाराने ब्लड कॅन्सरवरही विजय मिळवता येतो.

रक्त पाहून भोवळ येणे

रक्त पाहून भोवळ येण्याचा प्रकार हा साधारण मनातल्या जास्त भीतीमुळे होते. मोठी जखम झाल्यावर त्याचा संबंध मृत्यूशी लावलेला असते. आपल्या सगळ्यांच्या मनात रक्ताची भीती असते. भीती वाढल्यावर हृदयाचे ठोके वेगाने वाढून काहींचा रक्तदाब अचानक कमी होतो आणि मेंदूला रक्तदाब कमी होऊन डोळ्यासमोर अंधारी येते. एकदा तो माणूस खाली पडला की आपोआप मेंदूकडे रक्तपुरवठा सुरू होऊन त्यातून तो बाहेर येतो. त्यातून कोणी दगावत नाही. हा त्रास सगळ्यांना होतो असे नाही. या त्रासाला ‘वेजोवेगल सिन्कोपी’ असे म्हणतात. एका ठिकाणी जास्त उभे राहिले, गर्दीच्या ठिकाणी जास्त उभे राहिले तरी अशा लोकांना भोवळ येते. असा त्रास असल्यास एका ठिकाणी रोज पाच ते दहा मिनिटे स्तब्ध उभे राहायचे. सवय झाल्यावर भोवळ यायची कमी होते. तसेच त्यांनी नेहमी पाणी जास्त प्यायला हवे. शरिरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ देता कामा नये. त्यासाठी कुठली गोळी वगैरे देत नाहीत. याला एक टेस्ट आहे. ‘हेडअप टिल टेस्ट’या टेस्टमध्ये या आजाराचे निदान करता येते. काही कार्डिऍक सेंटरमध्ये अशाप्रकारच्या चाचणी करता येतात. भीती वाटण्यासारखा हा प्रकार नाही पण योग्य डॉक्टरचा सल्ला घेऊन त्याच्याबद्दल सगळी माहिती करून घेणे आवश्यक आहे.

रक्तगट

माणसाच्या शरीरातील रक्ताचे ओ, ए, बी आणि एबी असे चार गट पडलेले आहेत. आरएच पॉझिटिव्ह आणि आरएच निगेटिव्ह असेही प्रकार आहेत. यापैकी कुठला गट चांगला कुठला वाईट असं काही नसतं, पण आरएच निगेटिव्ह प्रकारचे रक्त फार कमी लोकांमध्ये असते. त्यामुळे अशा रुग्णांना जर रक्ताची गरज भासली तर ते मिळणं कठीण जातं, पण हल्ली ब्लड बँकमध्ये सगळ्याच प्रकारातील आणि गटांतील रक्त लगेच मिळू शकते.

 काय खायला हवे?

  • मोड आलेल्या धान्यांचा रोजच्या आहारात समावेश करा.
  • एक ग्लास सफरचंदाचा ज्यूस नेहमी प्यावा.
  • सफरचंदाच्या ज्यूसमध्ये बीटचा रस आणि चवीनुसार मध टाकावा. कारण या मिश्रणात लोहाचे प्रमाण जास्त असते.
  • नियमित बीट खाल्याने रक्त वाढण्यास मदत होते.
  • रात्री जेवणानंतर शेंगदाणे- गूळ एकत्र चावून खावा.
  • चहा आणि कॉफी कमी करा.
  • दोन चमचे तीळ दोन तास पाण्यामध्ये भिजवून ठेवा. नंतर पाणी गाळून तिळाची पेस्ट करून घ्या. यामध्ये मध मिसळून दिवसातून दोनदा हे मिश्रण खावे. रक्ताची कमतरता दूर होईल.
  • दिवसातून दोनदा थंड पाण्याने स्नान करा आणि सकाळी थोडा वेळ सूर्यप्रकाशात बसा.
  • दिवसातून एकदा गवती चहा, दालचिनी, बडीशेप सम प्रमाणात घेऊन चहा तयार करून प्या.

लेखक जनरल फिजिशियन आहेत.