पंतप्रधान मोदींना ‘जन की बात’ कळत नाही, शरद पवार यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यात भाजप सरकारला सर्वच पातळ्यांवर अपयश आले आहे. राष्ट्रीयीकृत बँका आज शेतकऱ्यांना दारात उभे करण्यास तयार नसल्याची विदारक स्थिती दिसून येत आहेत. जनतेच्या मनातील प्रश्न आजही सुटलेले नाहीत. देशाचे पंतप्रधान ‘मन की बात’ करतात. मात्र, त्यांना ‘जन कि बात’ कळत नाही, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केला. दरम्यान, जनतेच्या मनातील प्रश्न सोडविण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे, असेही ते म्हणाले. नगर येथे राष्ट्रवादीच्या कार्यालयात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी ते बोलत होते.

शरद पवार म्हणाले, सरकारने 81 हजार कोटींचे कर्ज माफ केल्याची घोषणा केली. मात्र, रिझर्व्ह बँकेकडून माहिती घेतल्यानंतर उद्योजकांचे राष्ट्रीयीकृत बँकांकडे असणारे कर्ज सरकारने माफ केल्याचे समजले. राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ आजही अनेक शेतकऱ्यांना मिळू शकलेला नाही. ही प्रक्रिया पूर्ण न झाल्याने राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना दारात उभ्या करत नसल्याचे विदारक चित्र आहे. सध्या जे सत्तेत आहेत, त्या भाजपवाल्यांना जनता सत्ताधारी मानत नाही. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाच आपले प्रश्न सोडविण्यासाठी सांगतात. आपण आजही सत्तेत आहोत, अशी जनसामान्यांची भावना आहे. त्यामुळे त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळ पडल्यास आपल्याला संघर्षाची भूमिकाही घ्यावी लागेल. भाजपविरोधात जनतेत रोष वाढतच असून, आपण एकदिलाने काम केल्यास त्याचा फायदा आपल्या पक्षाला होईल, असेही ते म्हणाले.

डाव्या विचारसरणीचा जिल्हा अशी नगर जिल्ह्याची ओळख होती. मात्र, या ठिकाणी भाजपाचे विचार आले आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी असो वा काँग्रेस यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने पाहून लोकांमध्ये गेले पाहिजे. संघर्ष केला, तर चित्र नक्की बदललेले दिसेल. लोकसभेच्या निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. आपल्याकडे तयारीसाठी अवघे काही महिने उरलेले आहेत. यासाठी घोंगडी बैठका घेण्याची धोरण पक्षाने आखले असून, याची अंमलबजावणी करावी, असेही शरद पवार म्हणाले.

वळसे-पाटील म्हणाले, आर्थिक वैभव असलेला जिल्हा म्हणून नगरचा परीचय मंध्यतरीच्या काळात झाला होता. मधल्या काळात आपल्या पक्षाची पीछेहाट झाली होती. राष्ट्रवादीची जिल्ह्यांमध्ये ताकद वाढवायची आहे. लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये आपल्याला उमेदवार निवडून द्यायचे आहेत. जिल्हा परिषदेमध्ये आपण काँग्रेससोबत आहोत. महानगरपालिकेची निवडणूक जिंकायची आहे, असेही ते म्हणाले.

जयंत पाटील म्हणाले, चंद्रशेखर घुले यांनी या जिह्यात चांगले काम उभे केले आहे. आता राजेंद्र फाळके यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे. लोकसभेच्या निवडणुका लवकरच होतील. त्यासाठी पक्षाने तयारी केली पाहिजे. आपण बुथ कमिटी करायलाच पाहिजे. राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये पक्ष वाढवायचा आहे, असेही ते म्हणाले.

मराठवाडय़ासह राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर

मराठवाडय़ासह नगर, सांगली, सातारा आणि पुण्याच्याही काही भागात दुष्काळाची स्थिती गंभीर बनत चालली आहे. या पट्टय़ात पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे. लोक चातकासारखी पावसाची वाट बघत आहेत. मात्र, सरकार कोणतीच भूमिका घेण्यास तयार नाही. अशीच स्थिती राहिली, तर दोन महिन्यानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होईल, असेही शरद पवार म्हणाले.