
सामना ऑनलाईन, रांची
केवळ आरक्षण देत राहिल्यामुळे आपला देश खरोखरच समृद्ध होईल का असा परखड सवाल लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केला आहे. ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला त्यांनी आपल्या समाजासाठी काय केले, असेही त्यांनी विचारले आहे. देशभरात अनेक राज्यांमध्ये ‘आरक्षणा’वरून मोर्चे, आंदोलने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर लोकसभाध्यक्षांनी पहिल्यांदाच आपली भूमिका जाहीरपणे मांडली आहे. येथील ‘लोकमंथन’ कार्यक्रमात बोलताना सुमित्रा महाजन यांनी मी आरक्षणविरोधी बिलकूल नाही, असे स्पष्ट केले. मात्र आरक्षणावरून काही गंभीर प्रश्नही उपस्थित केले.
मुदतवाढ देण्यामागे हेतू काय?
महाजन म्हणाल्या, समाजाचा समान विकास व्हावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ दहा वर्षांसाठी आरक्षणाची तरतूद केली होती, पण आज स्थिती काय आहे? आपण सतत आरक्षणाला मुदतवाढ देत आहोत. दर दहा वर्षांनी आणखी दहा वर्षांसाठी आरक्षणाला मुदतवाढ देण्यात आली. एकदा तर ती 20 वर्षे करण्यात आली. हे असे कुठपर्यंत चालणार? आरक्षणाला अशी मुदतवाढ देण्यामागे नेमका हेतू तरी काय आहे, असेही महाजन यांनी विचारले आहे.
सामाजिक समरसतेच्या गोष्टी सांगितल्या जातात, पण केवळ आरक्षण दिल्यानेच समाज बदलणार आहे का असे विचारून महाजन म्हणाल्या, ज्यांना आरक्षण मिळाले त्यांनी आणि ज्यांना मिळाले नाही त्यांनी, दोघांनीही चिंतन करण्याची गरज आहे. मला आरक्षण मिळाले, पण त्यानंतर माझ्या समाजासाठी मी काय केले याचा कुणी विचार केला आहे का? शिक्षण आणि नोकरीत आरक्षण दिले तर खरोखरच आपला देश समृद्ध होईल का, असेही महाजन यांनी परखडपणे म्हटले आहे.























































