सत्य, अहिंसेविरोधात पंतप्रधान मोदींची लढाई, राहुल गांधी यांचे टीकास्त्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । वर्धा

महात्मा गांधीजी यांनी सत्य आणि अहिंसेसाठी बलिदान दिले;. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रोज सत्य आणि अहिंसेविरोधात लढत आहेत. गांधीजी म्हणाले, नेहमी खरं बोला, मोदी रोज खोटं बोलतात. गांधीजींनी सांगितले, देश एकजूट करा पण मोदी देशात फूट पाडत आहेत, अशी जोरदार टीका आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.

महात्मा गांधीजींच्या 150व्या जयंतीनिमित्त आज काँग्रेस कार्यकारिणीची बैठक वर्धा येथील सेवाग्राम येथे झाली. यावेळी काँग्रेसने दुसऱया स्वातंत्र्यलढय़ाची हाक देत सुरुवात केली. त्यानंतर आयोजित सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका केली. महात्मा गांधीजींनी आपले संपूर्ण जीवन देशाला दिशा देत अर्पण केले. गांधीजींनी कधी हिंसा केली नाही, कोणाबद्दल कधी वाईट बोलले नाहीत, कोणाचा राग कधी केला नाही. नेहमी खरे बोला असे सांगितले. सत्य आणि अहिंसेसाठी गांधीजींनी बलिदान दिले; पण पंतप्रधान मोदी या विचारांच्या उलट वागतात. खोटं बोलतात, 15 लाख रुपये जनतेच्या खात्यात जमा करतो, वर्षाला 2 कोटी रोजगारांची निर्मिती करतो अशी खोटी आश्वासने देऊन मोदी सत्तेवर आले. मोदी हे दुसऱयांचा राग करतात, असा हल्ला राहुल गांधींनी चढवला.

नोटाबंदीनंतर सामान्य जनता बँकेच्या रांगेत उभी होती तेव्हा पंतप्रधान मोदींच्या मदतीने चोरांनी मागील दाराने प्रवेश करून कोटय़वधीचा काळा पैसा पांढरा केला. चार वर्षांत मोदींनी 15 ते 20 उद्योगपतींचे 3 लाख 20 हजार कोटींचे बँक कर्ज माफ केले, पण शेतकऱयांना कर्जमाफी दिली नाही, अशी टीकाही राहूल यांनी केली.

राहुल, सोनिया गांधी, मनमोहन सिंगांनी ताट धुतले
– काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सेवाग्राम येथे झाली. राहुल गांधी, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेस वर्किंग कमिटीचे 53 सदस्य उपस्थित होते.

– काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सेवाग्राममध्ये महात्मा गांधीजींना आदरांजली वाहिली. प्रार्थना सभेत सहभागी झाले. त्यानंतर नेत्यांनी भोजन केले. सेवाग्राम येथे जेवणानंतर स्वतःचे ताट स्वतः धुण्याची पद्धत आहे. त्यानुसार राहुल गांधींसह सर्व काँग्रेस नेत्यांनी स्वतःचे ताट स्वतः धुतले.