
सामना प्रतिनिधी । पुणे
नऱ्हे येथील परीक्षा केंद्रावर सर्व पुराव्यांसह रेल्वे भरतीची परीक्षा देण्यासाठी गेलेल्या 200 तरुणांना मुजोर कर्मचाऱयांनी परीक्षा देण्यापासून मज्जाव केला. आधार कार्डसह इतर सर्व ओळखपत्रे दाखवूनही त्यात थातूरमातूर त्रुटी असल्याचे सांगून त्यांना चक्क परीक्षा केंद्रावरून धक्के मारून हकलून दिले. या तरुणांनी पोलिसांकडे धाव घेतली. तेथेही काही मदत मिळाली नाही. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीही कानावर हात ठेवले. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हुकूमशाही विरोधात विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
रेल्वे भरती बोर्डाने ड श्रेणीच्या 64 हजार जागांसाठी बुधवारपासून देशभरात ऑनलाईन परीक्षा घेतली जात आहे. पुण्यात या परीक्षेसाठी नऱ्हेसह अन्य दोन केंद्रांवर परीक्षेची व्यवस्था केली होती. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यासह मराठवाडय़ातून मोठय़ा प्रमाणात उमेदवार परीक्षेसाठी आले होते. या ऑनलाईन परीक्षेसाठी सरकारी ओळखपत्र आणावे, अशी सूचना देण्यात आली होती. गुरुवारी सकाळी 9 वाजता परीक्षा असल्याने सकाळी सातपासून नऱ्हे येथील एका आयटी पार्कमध्ये उमेदवार येण्यास सुरुवात झाली. या वेळी तेथे नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांनी ओळखपत्रावरून वाद घालण्यास सुरुवात केली. आधार कार्ड नाकारल्यानंतर उमेदवारांनी लायसन्स, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र असे अनेक पुरावे दिले. तसेच मागणीप्रमाणे झेरॉक्सच्या प्रतीही काढून आणून त्यांना दिल्या. तरीही या मुजोर कर्मचाऱ्यांनी तरुणांवर दादागिरी करत परीक्षा देण्यापासून त्यांना रोखले. यावरून परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ झाला.
ओळखपत्रे बनावट असल्याचा जावईशोध
या तरुणांची ओळखपत्रे बनावट असल्याचा जावाईशोध या कर्मचाऱ्यांनी लावल्याने हे उमेदवार हतबल झाले. त्यांनी नऱ्हे येथील पोलीस चौकीत जाऊन तेथील पोलिसांकडे याबाबत तक्रार केली. पण पोलिसांनीही या तरुणांना तेथून हुसकावून लावले. तेथून त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. पण तरीही त्यांचे म्हणणे कोणीही ऐकून घेतले नाही.
कर्मचाऱ्यांची दादागिरी
पुण्यात चार परीक्षा केंद्रे होती, त्यापैकी केवळ नऱ्हे येथील परीक्षा केंद्रावर ओळखपत्रावरून गोंधळ निर्माण करण्यात आला. इतर ठिकाणी केवळ एका ओळखपत्राच्या पुराव्यावर उमेदवारांना परीक्षा देता आली. नऱ्हे येथील कर्मचाऱ्यांनी दादागिरी करत वाईट पद्धतीने विद्यार्थ्यांना बोलून, धक्के मारून तेथून त्यांना बाहेर काढले. 200पेक्षा जास्त जण यापासून वंचित राहिले आहेत, असा आरोप उमेदवारांनी केला आहे.
































































