आता पेणपर्यंत चाकरमानी सुसाट, पनवेल-पेण विद्युतीकरण पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

मध्य रेल्वेच्या पनवेल ते पेण सेक्शनमध्ये विद्युतीकरण पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे आता या मार्गावर ‘डेमू’ ऐवजी ‘मेमू’ गाड्या चालविणे शक्य होणार आहे. तसेच पनवेल ते पेणपर्यंत कोकणच्या गाड्याचाही वेग वाढणार असून इंजिन बदलण्याचा खटाटोपही वाचणार आहे. मध्य रेल्वेची रोह्यापर्यंत हद्द असून पनवेलपासून पेणपर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्यात यश आले आहे. या मार्गावर महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त इलेक्ट्रिक इंजिनाद्वारे चाचणी घेण्यात आली आहे.

या मार्गावरूनच कोकणच्या गाडय़ा जात असल्याने विद्युतीकरणाचा कोकण रेल्वेच्या मार्गासाठी फायदा होणार असून कोकण चाकरमान्यांचा प्रवास सुसाट होणार आहे. तसेच पनवेल ते पेण मार्गावर ‘डेमू’ ऐवजी आता ‘मेमू’ गाडय़ा चालविण्यासाठीदेखील हा बदल फायदेशीर ठरणार आहे. या मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण करण्यासाठी 23 ब्रिज मास्टसह 2000 ओएचई मास्ट, 100 हून अधिक मल्टी ट्रक पोर्टल आणि एक बोगदा अशी यांत्रिक उभारणी करण्यात आली असल्याचे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी स्पष्ट केले. या विद्युतीकरणाच्या कामामुळे कोकण प्रदेश आणि पश्चिम घाट सेक्शनसाठी नवा अध्याय सुरू झाल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी स्पष्ट केले.

मालगाडय़ांचा वेगही वाढणार
ऑक्टोबरअखेरपर्यंत रोह्यापर्यंत विद्युतीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. त्यानंतर थळपर्यंत मालगाडीचा आरसीएफ कारखान्यात जाणारा रेल्वे मार्गदेखील विजेवर चालणारा होणार आहे. त्यामुळे मालगाडय़ांची वाहतूक वेगाने होणार असून डिझेलमधील बचतीसह पर्यावरण संवर्धनदेखील शक्य होणार आहे.

summary- electrification till pen station has completed