
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
6000 कि.मी.वरील टार्गेट उद्ध्वस्त करणारी, शत्रूच्या टार्गेटवर एकाच वेळी 36 वेळा वार करण्याची क्षमता असलेली जगातील अत्यंत प्रभावी एस-400 मिसाईल सिस्टीम हिंदुस्थानच्या संरक्षण ताफ्यात येणार आहे. 40 हजार कोटी रुपयांना ही मिसाईल सिस्टीम रशियाकडून खरेदी करण्याच्या करारावर स्वाक्षऱया करण्यात आल्या. यामुळे हिंदुस्थानच्या हवाई दलाची ताकद वाढली आहे. विशेष म्हणजे अमेरिकेचा विरोध डावलून हा करार करण्यात आला आहे. दरम्यान, या करारामुळे पाकिस्तानला हादरा बसला आहे. हिंदुस्थानच्या दौऱयावर आलेले रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आठ करार करण्यात आले. त्यात एस-400 मिसाईल सिस्टीम करार महत्त्वपूर्ण आहे.
करारानंतर अमेरिकेची सावध प्रतिक्रिया
-अमेरिकेचे फायटर प्लेन, युद्ध बेस संपविण्यासाठी रशियाने 1967 मध्ये एस-200 मिसाईल सिस्टीम तयार केली. पुढे एस-300 आणि एस-400 बनविली. त्यामुळे अमेरिकेचा सुरुवातीपासून या सिस्टीमला विरोध आहे.
-2014 मध्ये रशियाने एस-400 च्या सहाय्याने युक्रेन देशातील क्रिमीचा प्रांत रशियाने काबीज केला. अमेरिकेसह युरोपियन देशांनी याला विरोध केला. रशियाशी कोणत्याही देशाने संरक्षणविषयक करार केल्यास निर्बंध लादू अशी धमकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती.
-ट्रम्प यांच्या धमकीला भीक न घालता आज हिंदुस्थानने रशियाबरोबर करार केला. करारानंतर तत्काळ अमेरिकन सरकारने सावध प्रतिक्रिया दिली आहे. निर्बंध लादणार म्हणजे आमच्या सहकारी देशांच्या संरक्षण क्षमतेला नुकसान करणे असा अर्थ नाही असे अमेरिकन दूतावासाचे म्हणणे आहे.
इराणकडून तेल आयात करणार
रशियासोबत महत्त्वपूर्ण संरक्षण करार केल्यानंतर आता हिंदुस्थानने अमेरिकेच्या संभाव्य आर्थिक प्रतिबंधांची भीती न बाळगता इराणकडून 12.5 लाख टन कच्चे तेल आयात करण्याची तयारी ठेवली आहे. हिंदुस्थानचा हा निर्धार पाहता अमेरिकेनेही काही काळासाठी नमती भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत.
दहशतवादाचा बीमोड करणार!
-पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्या द्विपक्षीय चर्चेनंतर आठ करारांवर स्वाक्षऱया झाल्या. त्यात एस -400 मिसाईलसह ‘गगनयान’ अवकाश मोहिमेचाही करार करण्यात आला आहे. हिंदुस्थानच्या ‘गगनयान’ मोहिमेला रशिया सहकार्य करणार आहे.
-दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यावर दोन्ही देशांचे एकमत असल्याचे संयुक्त निवेदनात म्हटले आहे. कोणत्याही प्रकारे दहशतवादाला थारा देऊ नये. आर्थिक रसद आणि शस्त्र्ाास्त्र्ाs पुरवू नयेत असा अप्रत्यक्ष इशारा पाकिस्तानला देण्यात आला आहे.
काय आहे? एस-400 मिसाईल
-रशियाने 2007 मध्ये एस-400 मिसाईल सिस्टीम लाँच केली.
-या मिसाईल सिस्टीममध्ये12 लाँचर आहेत. यातील एक लाँचर एकावेळी तीन मिसाईल लाँच करू शकते.
-6000 कि.मी.पर्यंतच्या शत्रूच्या विमानाचा निशाणा अचूक साधू शकते. तसेच एकावेळी तब्बल 36 वेळा वार निशाण्यावर करण्याची क्षमता आहे.
-जगातील सर्वाधिक आधुनिक मिसाईल सिस्टीम आहे. चीनने ही सिस्टीम रशियाकडून खरेदी केली आहे. पाकिस्तानकडे ही सिस्टीम नाही.
-एस-400 मिसाईलमुळे हिंदुस्थानच्या हवाई दल ताफ्याची संरक्षण ताकद वाढणार आहे.



























































