
>>कमलाकर देसले
कविता हे सार असते कवीच्या अनुभव विश्वाचे. कवी स्वतःला चिंतनाच्या मुशीतून जाळत असतो म्हणून कवी उजळत असतो. या जळण्या-उजळण्यातून कवीच्या हाती काही निष्कर्ष येतात, काही सूत्रं कवीला गवसतात. ही सूत्रे, हे निष्कर्ष म्हणजे कवीच्या कविता असतात. कवी सामान्यांपेक्षा जरा अधिक विचार करतो, चिंतन करतो. मर्यादित आयुष्य आणि अमर्याद जीवन या दोन पाटय़ात कवी आपले अनुभव दळतो. संघर्षाच्या घरघरीतून स्वतःला छळत असतो. निश्चयापासून ढळत नसतो. नुकताच कवी बी. एन. चौधरी यांचा ‘बंधमुक्त’ हा काव्यसंग्रह वाचण्यात आला. बालकवींच्या वावर असलेल्या धरणगावात वास्तव्यास असलेल्या चौधरी सरांना कवितेचा अनुग्रह जन्मतः मिळाला आहे.
आस्वादक समीक्षा लेखन, ललित लेखन, पत्रकारिता, व्यंगचित्र असा चौफेर संचार करत असणाऱया प्रा. बी. एन. चौधरी यांचे कविता प्रेम हे प्रथम क्रमांकावर असावे हे नक्की. जेव्हा एखादी सामान्य गोष्ट सहज मिळेनाशी होते किंवा अतिशय दुर्मिळ होते तेव्हा मग तिचे स्वप्नात रूपांतर होते. स्वप्ने ही पाऱयासारख्या निसटून जाणाऱया अनुभवांची असतात. कवीला हे सत्य कळलेले आहे म्हणून कवी नव्या आकलनाच्या परिघात सामान्य, पण हक्काच्या अनुभवाचे दुर्मिळ होत जाणे समजून घेत आहे आणि कवीच्या द्रष्टेपणाने ते कवितेत सांगतो आहे.
युगांचा अंधार गोठवला की, मगच त्यात प्रकाशाचे स्वप्न पाहता येते किंवा परंपरांचे जोखड खांद्यावर घेतले की, दुःख आपसूक डोंगराएवढे होते. चार ओळीत कवी खूप मोठा आशयाचा आवाका शब्दबद्ध करत असतो. ‘जात नाही ती जात’ असे म्हणण्याचा प्रघात आहे. कितीही नाकारले तरी ‘जात’ ही गोष्ट पुरोगामी लोकांच्याही पाठीवर भुतासारखी कधीतरी बसतेच. असेच असेल तर ‘जातीला’ हद्दपार करणे केवळ अशक्य आहे. कवी जरा वेगळा विचार करणारा असतो. इतकीच जात जात रक्तात आणि श्वासात भिनली असेल तर तिला उखडून फेकण्यापेक्षा तिला कर्तृत्वात, विद्वत्तेत आणि अंतिमतः मानवतेत रूपांतरित करता आले तर? असा हटके विचार कवी करून पाहतो आणि किती सहजसुंदररीत्या जातीची वेगळी वैचारिक मांडणी करतो त्याविषयीच्या या ओळी वाचकाला विचार करायला लावतात. स्वतंत्र विचार ही कवी बी. एन. चौधरी यांच्या कवितेची खासीयत आहे.
जातीला नवे परिमाण देणारे हे काव्य चिंतन अतिशय मूलभूत आहे. कविता ही काही केवळ शुष्क शब्दांची जोडणी नसते. कवितेइतकी जिवंत गोष्ट कुठली असावी? कवितेतले शब्द फुलांहून सुंदर, काटय़ाहून तीक्ष्ण, अमृताहून संजीवक, पण विषाहून मारक असतात. साध्या दिसणाऱया शब्दांत आशयाचे खूप मोठे अवकाश मावते. अर्थात घागर मे सागर भरण्याची ही किमया कवीशिवाय कुणाकडे नसते. खूपदा सामान्य माणसाचा गोंधळ व्हावा असे वाप्रयोग किंवा विधान कवी करतो, पण कवीला निश्चित असे काही सांगायचे असते. सपक विधान करणे म्हणजे कविता नसते. गद्य तर कुणीही बोलतो, सूचकता हा कवितेचा खूप मोठा गुण आहे. अल्पाक्षरत्व आणि बहुअर्थसूचकता हे कवितेचे विशेष आहेत. प्रतिमा, प्रतीके हे कवितेचे अलंकार आहेत. कविता थेट आणि सरळ नाही बोलत. तिच्या वाटा वळणे वक्राकार असतात. वाचकाला कवितेमागे प्रियकरासारखे फिरता आले पाहिजे. तेव्हा मग कविता वाचकाला आकलनाला अनुकूल होते.
ऋषी आणि कृषीप्रधान परंपरा सांगणाऱया देशात स्वातंत्र्याच्या साठीत आत्महत्या करण्याचा जीवघेणा पर्याय निवडावा लागतो हे इथल्या शासन आणि प्रशासन व्यवस्थेचे फार मोठे अपयश आहे. छोटे दुकान असो की शहरातला मोठा मॉल असो, तिथे मिळणाऱया मालाचा, वस्तूंचा भाव आपण नाही ठरवू शकत. मिळेल त्याच किमतीत आपणांस तो माल घ्यावा लागतो. मात्र, स्वातंत्र्याच्या साठीत शेतकऱयाच्या मालाचा भाव शासन किंवा व्यापारी ठरवतात हे अन्यायकारक चित्र आहे. कर्ज पाचवीला पूजलेला बळी खरंच बळी दिला जातो आहे. शेतकऱयांचे आत्महत्येचे सत्र थांबता थांबत नाही. कर्जमुक्ती किंवा शासकीय भरपाई हा काही शेतकरी आत्महत्येवरचा अंतिम उपाय नाही. शेतकरी स्वावलंबी कसा होईल. त्याच्या मालाला हमी भाव कसा मिळेल अशा मूलभूत गोष्टींवर जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत शेतकऱयाच्या जीवनातली उपेक्षा थांबत नाही.
मानवी जीवनमूल्यांवर अढळ श्रद्धा ठेवत, जीवनविषयक चिंतन करणारे, सामाजिक व्यंग-विसंगतीवर कोरडे ओढत, निसर्ग, प्रेम या उच्चतम भावभावनांचा आदर करत, समताधिष्ठत विचारांची कविता लिहिणारे कवी बी. एन. चौधरी हे प्रतिभावंत कवी आहेत. छंदोबद्ध आणि मुक्तछंद आशा दोन्ही प्रकारांत ते काव्यलेखन करतात. बालकवींच्या नंतरच्या वर्तमान पिढीतील ते उत्तम कवी आहेत. दुःखमुक्ती हे बुद्धांच्या जीवनाचे तत्त्व हेच बी. एन. चौधरी यांच्या कवितेचे केंद्रीय सूत्र आहे. ‘बंधमुक्त’ हे शीर्षकही या अर्थाने अतिशय सूचक आणि अर्थपूर्ण असेच आहे. त्यांच्या मानवतावादी स्वभावाच्या काव्य प्रवासाचा परीघ मोठा आहे, पण निवडक संदर्भातून त्यांची काव्य प्रवृत्ती आणि प्रकृती शोधण्याचा हा प्रयत्न आहे. समजायला सुगम असलेला हा कवी वाचकाने त्याच्या कवितेतून जाणून घ्यावा असाच आहे. खान्देशातील कवितेच्या पालखीला श्रद्धेने पुढे नेणाऱयांतील बी. एन. चौधरी हे एक महत्त्वाचे नाव आहे. त्यांच्या पुढील कवितेच्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा!
बंधमुक्त (काव्यसंग्रह)
कवी- प्रा. बी. एन. चौधरी
प्रकाशन- अथर्व, जळगाव
पृष्ठ- 78, मूल्य- 70 रुपये



























































