
सामना ऑनलाईन । पाटणा
देशात महिला सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. गुजरात येथे १४ महिन्यांच्या बाळावर अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच बिहार येथे छेडछाडीला विरोध करणाऱ्या ४० मुलींसोबत सामूहिक हिंसाचार झाल्याचं समोर येत आहे.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, बिहारच्या सुपौल या गावात ही भयंकर घटना घडली आहे. येथील कस्तुरबा गांधी वसतिशाळेतल्या या विद्यार्थिनी आहेत. शाळेच्या भिंतीवर अश्लील मजकूर लिहिणाऱ्या विकृताला रोखल्यामुळे या मुलींना मारहाण करण्यात आली आहे. गेले काही महिने या विद्यार्थिनी छेडछाडीचा सामना करत होत्या. या गावातील विकृत तरुण त्यांच्या शाळेच्या भिंतींवर अश्लील मजकूर लिहित होते. शनिवारी या तरुणांचा त्रास सहन न होऊन शाळेतील काही विद्यार्थिंनी मजकूर लिहिणाऱ्या एका तरुणाला याचा जाब विचारत त्याची खरडपट्टी काढली.
या घटनेनंतर काही वेळातच शाळेसमोर सुमारे २४ हून अधिक तरुण जमा झाले. त्यांनाही मुलींनी तिथून जाण्यास सांगितलं. त्यावर चिडलेल्या त्या तरुणांनी शाळेची मोडतोड करायला सुरुवात केली. त्यालाही विद्यार्थिनींनी विरोध केला असता त्यांनी हातातल्या काठ्यांनी मुलींना मारहाण करायला सुरुवात केली. सुमारे तासभर हा प्रकार सुरू होता. मात्र, मुलींना वाचवण्यासाठी कुणीही पुढे आलं नाही. या घटनेत सुमारे ४० विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत. ही घटना जिल्हा प्रशासनाला समजल्यानंतर शाळेत रुग्णवाहिका आल्या आणि सगळ्या विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
summary- 40 girls got beaten up by perverts
























































