
सामना प्रतिनिधी । लातूर
लातूर तालुक्यातील तांदुळजा व कानडी बोरगाव परिसरात वाहणार्या विजेच्या 33 के.व्ही. उच्च दाब विद्युत प्रवाहात झालेल्या बिघाडामध्ये शॉर्ट सर्किट होऊन विद्युत प्रवाह वाणार्या तारेच्या ठिणग्या उडाल्या. या ठिणग्या परिसरातील ऊसावर पडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असून ऊसाचे फड जळून संपुर्ण 16 शेतकर्यांचा 22 एकर तोडणीस आलेला ऊस उध्वस्त झालेला आहे. त्याची माहिती मिळताच त्या भागातील शेतकर्यांना सोबत घेऊन जननायक संघटनेचे तालुकाध्यक्ष माधवराव गायकवाड यांनी या नुकसानग्रस्त ऊसाचे त्वरीत पंचनामे करून शासन व वीज महामंडळाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी तहसिलदार अमोल कांबळे व विज मुरूड परिमंडलाचे उपअभियंता बोंबडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबतची तातडीने माहिती नुकसानग्रस्त शेतकर्यांनी लोकनेते माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर यांना भ्रमणध्वनीद्वारे देऊन नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पाऊले उचलावीत, अशी मागणी केल्याने माजी आ.कव्हेकर यांनी वीज परिमंडल लातूर विभागाचे मुख्य अभियंता आर.आर.कांबळे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे व उपअभियंता, मुरूड श्री. बोंबडे यांना दुरध्वनीवरून संपर्क साधून संपुर्ण जळालेल्या ऊसाची माहिती देऊन याबाबतीत त्वरीत विज महामंडळाने चौकशी व पंचनामे करून तातडीने एकरी 50 हजार रूपये नुकसानग्रस्त शेतकर्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी केली. त्यावर चिफ इंजिनियर,लातूर यांनी याबाबत त्वरीत ऊसाचे पंचनामे करून शेतकर्यांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
या विद्युत प्रवाहामुळे व्यंकट चिंचकर (40 आर), मन्मथ चिंचकर (20 आर), रामभाऊ सिंधाळकर(80 आर), भगवान चिंचकर (20 आर), बजरंग जाधव (20 आर), श्रीमंत जाधव (60 आर), सुधाकर जाधव(40 आर), मिराबाई जाधव (20 आर), लोचनाबाई जाधव (40 आर), सविता बावने (50 आर), आश्विनी भिसे (20 आर), मेहबाब बागवान (40 आर) आदी शेतकर्यांच्या ऊसाचे क्षेत्र जळून खाक झाले आहे.
































































