ज्येष्ठ पत्रकार सुहास फडके यांचं निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
सुहास फडके,ज्येष्ठ पत्रकार

सामना ऑनलाईन । मुंबई

ज्येष्ठ पत्रकार, राजकारण, अर्थकारण आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे जाणकार सुहास फडके यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. मुंबई येथील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना रंजना फडके आणि मुलगी साहिली असा परिवार आहे. फडके यांच्या निधनाबद्दल मान्यवरांना तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.

भांडुपमधील दातार कॉलनी येथील निवासस्थानी सायंकाळी पाच वाजता त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. मनमिळावू व दिलखुलास स्वभावाच्या फडके यांचा मित्रपरिवार मोठा होता. पत्रकारितेबरोबरच राजकारण व सामाजिक क्षेत्रातही त्यांनी माणसं जोडली होती. विशेष म्हणजे, कुठल्याही पदावर नसतानाही त्यांचे हे संबंध अखेरपर्यंत टिकून होते. निवृत्तीनंतरही त्यांच्यातला पत्रकार कधी स्वस्थ बसला नाही. अनुवाद, ब्लॉग व स्तंभ लेखनाचे त्यांचे काम अखंड सुरू होते.

सुहास फडके यांचा जन्म ६ मे १९५४ रोजी झाला. रुईया महाविद्यालयातून त्यांनी बीएची पदवी घेतली. त्यानंतर ते ‘ब्लिट्झ’ साप्ताहिकात रुजू झाले. तिथं काही वर्षे पत्रकारिता केल्यानंतर त्यांनी मुंबई दूरदर्शन, आकाशवाणी व इंडिपेंडेंट इथं विविध पदांवर काम केले. बॉम्बे टाइम्समध्ये त्यांनी सिटी एडिटर व विशेष प्रतिनिधी म्हणून जबाबदारी सांभाळली. तब्बल १२ वर्षे त्यांनी इंग्रजी वृत्तपत्रांत काम केले. त्यानंतर दीर्घकाळ ते दैनिक महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत होते. मटामध्ये त्यांनी क्रीडा पत्रकार, स्थानिक प्रतिनिधी म्हणून काम पाहिले.

summary- senior journalist suhas phadke passes away