
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
मॉर्निंग वॉकच्या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक भाट्ये येथील आदिवासी विकास विभागाच्या आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहाला भेट दिली. 50 मुलींची रहाण्याची व्यवस्था असलेल्या त्या वसतिगृहात एकाही विद्यार्थिनीने प्रवेश घेतला नसल्याची माहिती उघडकीस आली. वसतीगृहाची इमारत भाड्याच्या जागेत असल्यामुळे रिकाम्या वसतीगृहासाठी हजारो रुपये भाडे शासन भरत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यागोष्टीकडे गांभीर्याने पाहिले आहे.
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मॉर्निंगवॉकच्यानिमित्ताने शहरालगत असणार्या भाट्ये येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहाला भेट दिली. त्या ठिकाणी असणार्या सोईसुविधा याविषयी माहिती घेताना या आदिवासी विकास विभागाच्या मुलींच्या शासकीय वसतिगृहात सहा मुलींसाठी एक खोली याप्रमाणे 9 खोल्यांची व्यवस्था असून 50 मुलींना रहाण्याची चांगली व्यवस्था आहे. ही इमारत शासकीय नसल्यामुळे दर महिन्याला सुमारे 28 हजार रुपये भाडे दिले जाते. परंतु या शासकीय वसतिगृहात मुलीच रहात नसल्याचे वास्तव पुढे आले. तसेच हे वसतिगृह सुरु राहण्यासाठी भाडे आणि तेथे कर्मचार्यांचे मानधन असे हजारो रुपयांचा पैसा खर्च होत आहे .सध्या वसतीगृहाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया असल्यामुळे रत्नागिरीतील वसतीगृहाकडे विद्यार्थिंनीनी पाठ फिरवली आहे असे दिसून येते.






























































