लेख : नवरात्र अर्थात शारदीय शक्तिपूजा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>अमोल करकरे<<

आजपासून नवरात्रारंभ होत आहे. हा उत्सव सर्वत्र मोठय़ा प्रमाणात साजरा होतो तोसुद्धा भक्तिभावाने. त्यानिमित्ताने शास्त्रशुद्ध माहिती असणे गरजेचे असते. तरच केलेली भक्ती पूर्ण फलदायी ठरते. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून होणाऱ्या नवरात्र काळात शरद ऋतू असल्याने या नवरात्रास शारदीय नवरात्र असे म्हणतात. नवरात्र हा अत्यंत महत्त्वाचा कुळधर्म असून तो सर्वांकडे कटाक्षाने पाळला गेला पाहिजे.  आपण देवघरात रोज पूजा करत असलेल्या कुलदेवतेतील देवत्व अधिक अधिक प्रभावी व्हावे, त्याचे आपल्या घरावर कृपाछत्र असावे व अदृष्ट शक्तींपासून कुळास संरक्षण मिळावे या हेतूने शास्त्रात नवरात्र सांगितले आहे. नवरात्राचे दुसरे फळ वंशवृद्धी असेही आहे. अनादी काळापासून आपल्याकडे नवरात्राची परंपरा आहे. राम-रावण युद्धातही रावणाच्या वधासाठी रामाने नवरात्रात देवीचे पूजन केले होते.

नवरात्र व्रताचे प्रकार ः–

1) प्रतिपदा ते नवमी हे संपूर्ण नवरात्र

2) प्रतिपदा ते सप्तमी हे सप्तरात्री व्रत

3) पंचमी ते नवमी हे पंचरात्री व्रत

4) सप्तमी ते नवमी हे त्रिरात्री व्रत

नवरात्रीची अंगे ः नवरात्रीची प्रमुख चार अंगे आहेत. 1) देवता स्थापन 2) माला बंधन 3) नंदादीप (अखंड दीप) 4) कुमारिका पूजन ही आहेत. काही जणांकडे (वेदिका) शेत स्थापना करतात. त्यासाठी वेदिकेत शेतातील काळी माती आणून त्यात सप्तधान्ये हळदीच्या पाण्यात रंगवून पेरावीत व त्यावर घट (मातीचे भरणे) ठेवून त्यामध्ये सुपारी व दक्षिणा टाकून घटाला दोरा बांधून घटाला पाच नागवेलीची पाने (खायची पाने) लावून त्या घटात पाणी भरून त्यावर नारळ ठेवून त्याची पूजा करतात. त्या शेतीवर ठेवलेल्या घटावर पाच ज्वारीचे हिरवे खांब किंवा उसाचे हिरवे खांब लावून मंडपी तयार करून नवरात्रात माला बंधन करताना त्या वेळेस उपलब्ध असलेल्या सुवासिक फुलांची रोज एक माळ बांधतात. (मंडपीला बांधून रोज एक घटावर सोडावी.)

स्कंद पुराणात वयानुसार कुमारिकेचे प्रकार सांगितले आहेत. 2 वर्षांची कुमारी, 3 वर्षांची त्रिमूर्तीनी, 4 वर्षांची कल्याणी, 5 वर्षांची रोहिणी, 6 वर्षांची काली, 7 वर्षांची चंडिका, 8 वर्षांची शांभवी, 9 वर्षांची दुर्गा व 10 वर्षांची  सुभद्रा.

नवरात्रात सप्तशती पठणाचे विशेष महत्त्व आहे. सप्तशतीच्या मंत्रातील एक एक अक्षर म्हणजे अग्निसमान आहे. मार्कंडेय पुराणात देवी असे म्हणते की, जो मनुष्य माझे माहात्म्य श्रवण करील त्या मनुष्याच्या सर्व पीडा मी हरण करीन. सर्व शांतिकर्म – दुःस्वप्न – उग्र अशा ग्रहपीडा प्राप्त असता सप्तशती पाठ केल्याने त्या दूर होतील, असे देवी माहात्म्य सांगते. राहुकाळात सप्तशती पाठाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. अश्विन महिन्यातील अष्टमीस देवीची अनेक प्रकारे उपासना केली जाते. तसेच त्या दिवशी मध्यरात्री भद्रकालीची उत्पत्ती म्हणून या तिथीस महाअष्टमी म्हणतात. नवरात्रात प्रत्येक वारी देवीस कोणते नैवेद्य दाखवावे ते देवी भागवतात सांगितले आहे ते पुढीलप्रमाणे. रविवारी पायस (खीर), सोमवारी गाईचे तूप, मंगळवारी केळी, बुधवारी लोणी, गुरुवारी खडीसाखर, शुक्रवारी साखर, शनिवारी गाईचे तूप… नवरात्रात प्रामुख्याने दुर्गास्तोत्र वाचन, महालक्ष्मी अष्टक, कनकधारा स्तोत्र, रामरक्षा, देव्यपराध स्तोत्र, श्रीसुक्त, सिद्धकुंजिका स्तोत्र व नवार्णव मंत्र रोज 11 माळा जप इत्यादी स्तोत्रांचे यथाशक्ती पठन करावे. सप्तशतीचा पाचवा अध्याय रोज पठण करणे हीसुद्धा देवीची मनोभावे प्रार्थनाच आहे.