
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईतील टोलेजंग इमारतींच्या खिडक्या आपत्कालीन स्थितीत सहज उघडता येणाऱया आणि सुरक्षित बनवणे बिल्डरांना बंधनकारक करण्यात येणार आहे. याबाबत शिवसेनेच्या मागणीचा ठराव आज पालिका सभागृहात मंजूर करण्यात आला. यामुळे आग आणि इमारत दुर्घटनेत बंदीस्त लोखंडी जाळ्यांच्या खिडक्यांमुळे वाढणारी जीवित-वित्तहानी वाचणार आहे.
झपाटय़ाने विकसित होणाऱया मुंबईत टोलेजंग इमारती बांधण्याचे प्रमाण शहरासह उपनगरांमध्येही वाढले आहे. या इमारतींना मोठमोठय़ा खिडक्या ठेवल्या जातात. या खिडक्या लोखंडी जाळ्यांनी बंद केल्या जातात. त्यामुळे आग किंवा इमारत कोसळण्याच्या दुर्घटनांमध्ये अग्निशमन दलाला मर्यादा येतात. या लोखंडी खिडक्या तोडण्यात बराच वेळ जात असल्यामुळे जीवित आणि वित्तहानी वाढते. अलीकडेच घडलेल्या कमला मिल दुर्घटना आणि क्रिस्टल टॉवर आग दुर्घटनांमध्ये हा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर शिवसेना नगरसेविका अरुंधती दुधवडकर यांनी मुंबईतील इमारतींना आपत्कालीन स्थितीत सहज उघडता येणाऱया खिडक्या बसवणे बिल्डरांना बंधनकारक करावे अशी मागणी केली होती. याला सभागृहाने एकमताने मंजुरी दिली.
लवकरच अंमलबजावणी
पालिका महासभेत मंजूर झालेल्या ठरावाच्या सूचनेची आयुक्तांच्या मान्यतेनंतर अंमलबजावणी होणार आहे. यानुसार पालिकेची इमारतींना परवानगी देण्याची नियमावली, अग्निप्रतिबंधक उपाययोजना मार्गदर्शक नियमावलीमध्ये सुधारणा करण्यात येतील. यानंतर विकासकांना बांधकाम करताना अशा ‘सुरक्षित’ खिडक्या बनवणे बंधनकारक होईल. यामुळे लोखंडी खिडक्यांमुळे बचाव कार्यात येणारे अडथळे दूर होणार आहेत.





























































