उपवासाच्या पदार्थांना वाढती मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पुणे

नवरात्रोत्सवास सुरुवात होत आहे. या काळात भाविकांकडून उपवासाच्या पदार्थांना वाढती मागणी असते. यंदा राज्यासह परराज्यांत सर्व प्रकारच्या पिकांचे उत्पादन चांगले झाल्याने मार्केट यार्ड येथील भुसार बाजारात शेंगदाणा, साबुदाणा, राजगिरा, भगर आदी उपवासाच्या साहित्याची मोठी आवक होत आहे. परिणामी, आवकेच्या तुलनेत मागणी कमी असल्याने दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत १० ते १५ टक्क्यांनी घट झाली आहे.

घटस्थापना अवघ्या एका दिवसावर आल्याने उपवासाच्या साहित्याला मागणी वाढली आहे. मार्केट याडमधील भुसार बाजारात वरई भगरीची नाशिक, ठाणे, तसेच रायगडच्या पट्ट्यातून दररोज ७ ते १० गाड्या आवक होत आहे. तर, तमिळनाडूमधील सेलम जिल्ह्यातून एक्स्ट्रा सुपर फाइन, मिल्क व्हाइट आणि साधा या प्रकारांमधील १० ते १२ गाड्या साबुदाणा आणि कर्नाटक, गुजरात आदी राज्यांच्या विविध भागांतून गुजरात जाडा, कर्नाटक घुंगरू आणि स्पॅनिश आदी प्रकारांतील १० ते १५ गाड्या शेंगदाणा बाजारात दाखल झाला आहे. उत्तर हिंदुस्थानातूनही शिंगाडा, कुट्टू आदी पदार्थांची आवक मोठ्या प्रणाणात वाढली आहे. उपवासाची दशमी, पुरी, भाजणी, थालीपीठ तयार करण्यासाठी भाविकांकडून भगर पीठ, राजगिरा पीठ, साबुदाणा पीठ, कुट्टू पीठ आदींची खरेदी करण्यात येत आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भगरीच्या उत्पादनात वाढ झाल्याने दरात १५ टक्क्यांनी घट झाली आहे. मागील वर्षी भगरीला प्रतिकिलो १०० रुपये दर मिळाला होता. काही दिवसांपूर्वी साबुदाण्याचे दर तेजीत होते. मात्र, शेतकऱ्यांनी साठवणुकीतील माल बाहेर काढल्यानंतर साबुदाण्याचे दर उतरले आहेत. मागणीच्या तुलनेत उपवासाच्या पदार्थांची आवक जास्त असल्याने त्याचे दर वाढण्याची शक्यता नाही. येथील घाऊक बाजारात राजगिरा पिठाला १८० रुपये, साबुदाणा पिठाला १४० रुपये, भगर पिठाला १६० रुपये, तर शिंगाडा पिठाला ४०० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. मात्र, घाऊक बाजारात साबुदाण्याला ३९ ते ४६ रुपये, शेंगदाणा ६२ ते ८९ रुपये, भगर ६० ते ६४ रुपये, तर राजगिNयाला ६८ ते ७० रुपये प्रतिकिलो इतका दर मिळत असल्याचे व्यापाNयांनी सांगितले.