
सामना प्रतिनिधी, मुंबई
नवरात्रौत्सवानिमित्त मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रात गरब्याची धूम आहे. अवघी तरुणाई रासगरबा आणि दांडियात घुमू लागली आहे. मोकळी मैदाने, सोसायटय़ा, टेरेस आणि अगदी गल्लीबोळांमध्येही गरबा-दांडिया खेळून नवरात्रीचा जागर केला जात आहे. लाऊडस्पीकरची मर्यादा पाळतानाच अनेक ठिकाणी लाऊडस्पीकरशिवायही पारंपरिक गीतांवर गरबा खेळला जात आहे.
नवरात्रीसाठी मुंबई, ठाण्याच्या बाजारपेठांमध्ये गुजराती, राजस्थानी पद्धतीच्या पेहरावांना मोठी मागणी होती. अशाच पेहरावातील तरुणाई गरबा-दांडियात थिरकताना दिसत आहे. ‘फोक’ दांडिया, साल्सा दांडिया, पल्ली जग गरबो, गोप रास असे दांडिया नृत्याचे विविध प्रकार पाहण्यासाठी रसिकांचीही गर्दी होत आहे. मुंबईतील गल्लीबोळांमध्येही गरबा खेळला जात आहे. गुजराती लोकगीतांवरील गरबा-दांडियासह फिल्मी गाण्यांच्या ठेक्यावर ताल धरणारा ‘मॉडर्न गरबा’ही लक्षवेधी ठरला आहे. नवरात्रीनिमित्त उत्साह, ऊर्जा, संस्कृती-परंपरा जतन करण्याबरोबरच दांडिया नृत्याचा मनसोक्त आनंद तरुणाई घेत आहे.
गरबो नाय… इव्हेंट
गरबा-दांडियाची संस्कृती जपता यावी म्हणून एकीकडे गरबाप्रेमींची धडपड सुरू असताना गरबा हा अनेक ठिकाणी ‘इव्हेंट’ कंपन्यांनी हायजॅक केला आहे. गरबा कार्यक्रमासाठी या कंपन्यांनी मोठमोठय़ा जाहिरातीही मिळवल्याचे दिसून येते. बोरिवलीतील प्रमोद महाजन क्रीडा संकुल, गोरेगावचे नेस्को संकुल, कोरा केंद्र, ठाण्यातील मॉडेला मिल कंपाऊंड येथील गरबा कार्यक्रमांच्या तिकीट्स हजारो रुपयांना विकल्या गेल्या.
summary- mumbai and thane citizens enjoying garba



























































