
सामना ऑनलाईन । मुंबई
रिझर्व्ह बँकेने काढलेल्या नव्या नियमावलीचे पालन करण्याची हमी व्हॉटस्ऍपने दिली असून आता व्हॉटस्ऍपच्या मदतीने केल्या जाणाऱ्या सर्व ऑनलाइन पेमेंटस्संबंधातील डाटा हा देशातच सुरक्षित राखला जाणार आहे. त्यासंदर्भात सुरक्षेच्या सर्व सोयी कंपनीने तयार केलेल्या आहेत. या वर्षीच एप्रिलमध्ये रिझर्व्ह बँकेने एक नियमावली काढून सर्व पेमेंट सिस्टीमच्या संचालकांना पेमेंटसंदर्भातील सर्व डेटाबेस हा स्थानिक स्तरावरच सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य त्या हालचाली करण्याची सूचना केली होती. व्हॉटस्ऍपच्या जोडीलाच विसा, फेसबुक, अमेरिकन एक्स्प्रेस, पेपाल आणि गुगलसारख्या कंपन्यांनादेखील आपल्या पेमेंट व्यवहारासंदर्भातील सर्व डाटा स्थानिक स्तरावरच सुरक्षित ठेवावा लागणार आहे. प्रत्येक व्यवहाराची नोंद या डेटाबेसमध्ये असायलाच हवी असेदेखील या कंपन्यांना कळविण्यात आले आहे.
























































