परतीचा पाऊस गेला कुठे?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>श्रीनिवास औंधकर

काही दशकांपूर्वीपर्यंत पावसाळ्यात भरपूर पाऊस कोसळायचा, परंतु परंपरेने पावसाळ्यात पाऊस पडण्याचे आता म्हणावे तेवढे दिवस राहिलेले नाहीत. अपवादात्मक परिस्थितीत भर उन्हाळ्यात गारपीट होऊ शकते आणि पावसाळ्यात उन्हाचे कडक चटके सोसावे लागू शकतात. आपल्याकडे साधारणतः जूनमध्ये पावसाळा सुरू होतो आणि सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस पडून गेल्यानंतर पावसाळा संपतो. त्यानंतर दिवाळीच्या दिवसांतच कडाक्याची थंडी असे सर्वसाधारण ऋतुमान अलीकडील काळापर्यंत होते. परंतु यंदा मात्र परतीचा पाऊसच काय, पण परतीचे ढगही दिसून आले नाहीत. पाऊस गायब होऊन आता तब्बल पावणेदोन महिने होत आले आहेत. त्यात परतीच्या पावसानेही दांडी मारली. हा परतीचा पाऊस अखेर गेला कुठे?

दाच्या हवामानाची वैशिष्टय़े पाहिली असता असे दिसून येते की, यंदा उत्तर हिंदुस्थानातील हिवाळा वेळेआधीच आलेला आहे. उत्तरेत 25 ते 27 सप्टेंबर दरम्यान जोरदार हिमवृष्टी झालेली आहे. नोंदी असे सांगतात की, हिमाचल प्रदेश आणि कश्मीरच्या पर्वतीय क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात बर्फवृष्टी झालेली आहे. सध्या हिंदुस्थानच्या दोन्ही बाजूला, हिंद महासागरात आणि बंगालच्या उपसागरात दोन चक्रीवादळे घोंगावताहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होउैन चक्रीवाताचे रूपांतर आता चक्रीवादळात झालेले आहे. या चक्रीवादळाला ‘तितली’ असे नाव देण्यात आलेले आहे. लेख प्रकाशित होईपर्यंत ते हिंदुस्थानच्या पूर्व किनाऱयावर येऊन धडकलेले असेल. गेल्या महिन्यातही 21 ते 23 सप्टेंबर या कालावधीत बंगालच्या उपसागरात अशाच प्रकारचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. त्यातून चक्रीवादळही निर्माण झाले होते आणि या चक्रीवादळामुळे विदर्भ, मराठवाडय़ासह पश्चिम महाराष्ट्रात चांगला पाऊस पडेल, अशी अपेक्षा होती. आपल्याकडे ज्या काळात परतीचा पाऊस पडतो नेमक्या त्याच काळात हा पाऊस होणे अपेक्षित होते. परंतु असे होऊ शकले नाही. हे असे का घडले?

दुसरे चक्रीवादळ 10 ऑक्टोबर रोजी अरबी समुद्रात निर्माण झालेले आहे. या चक्रीवादळास ‘लोबान’ असे नाव देण्यात आलेले आहे. हे चक्रीवादळ ओमान या देशाकडे धडकले. बंगालच्या उaपसागरातील चक्रीवादळ हिंदुस्थानच्या पूर्व किनारपट्टीवर आणि अरबी समुद्रातील चक्रीवादळ ओमानच्या पूर्व किनारपट्टीवर. जागतिक पातळीवरचा एकूणच चक्रीवादळांचा अभ्यास केला असता असे दिसून येते की, समुद्रात ठिकठिकाणी निर्माण झालेली वादळे, चक्रीवादळे ही त्या त्या देशाच्या पूर्व किनारपट्टीवरच जाऊन धडकलेली आहेत. जपानपासून ते अमेरिकेपर्यंत प्रत्येक देशाच्या पूर्व किनारपट्टीवर अशी वादळे धडकलेली आहेत.

विदर्भ, मराठवाडय़ासारखा निवडक प्रांतांचा विचार करता त्याचा थेट संबंध पॅसिफिक महासागरातील वाढत्या तापमानाशी आहे. पॅसिफिक महासागरातील विषुववृत्तावरील तापमानात सरासरी तापमानापेक्षा 0.5 डिग्री सेल्सिअसने वाढ झालेली असून, त्यामुळे या महासागरात ‘अलनिनो’सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये ही परिस्थिती 50 टक्क्यांपर्यंत आली आहे. येत्या काळात प्रशांत महासागरातील तापमानात वाढ होत जाऊन जानेवारी, फेब्रुवारी 2019 पर्यंत तेथील परिस्थिती 70 टक्क्यांपर्यंत वाढत जाणार आहे.

‘अल निनो’चा प्रभाव
प्रशांत महासागरातील विषुववृत्तावर वाहणाऱया गरम पाण्याच्या प्रवाहाला ‘अल निनो’ असे म्हटलेले आहे. साधारणतः डिसेंबर महिन्यात हा प्रभाव आढळून येत असल्यामुळे त्याला हे नाव पडले आहे. त्यामुळे समुद्रातील हजारो चौरस किलोमीटर क्षेत्रफळावरील पाण्याच्या तापमानात वाढ होत जाते. साधारणतः एक दीड सेल्सिअसने तापमान वाढल्यास त्याचा पाऊस पडण्यावर परिणाम होतो. चांगला मोसमी पाऊस पडण्यासाठी हवेचा दाब कमी असावा लागतो. अल निनोमुळे हिंदी महासागरात जास्त दाबाचा पट्टा निर्माण होऊन हिंदुस्थान व त्याच्या शेजारी राष्ट्रांत मोसमी पाऊस कमी पडतो किंवा पडतही नाही. यंदा अल निनोचा प्रभाव वाढतच जाणारा असल्याचे दिसून येत असल्यामुळे आगामी काळात आपल्या देशात, महाराष्ट्रात पाऊस जरा कमीच राहणार आहे.

यंदा उत्तर हिंदुस्थानात ध्रुवीय वारे वेळेच्या आधीच सक्रिय झालेले आहेत. त्यामुळे उत्तर हिंदुस्थानात थंडीचे प्रमाण जास्त असणार आहे तर विषुववृत्तीय भागात म्हणजे महाराष्ट्र व त्याखालच्या दक्षिण हिंदुस्थानात दुपारी उन्हाचा चटका तर पहाटे थंडीचा कडाका जाणवेल. थंडीच्या दिवसात पाऊस अपेक्षित असला तरी एकूणच तापमानविषयक परिस्थितीचा अंदाज पाहता विदर्भ व मराठवाडय़ात पावसाचे प्रमाण जरा कमीच असेल. साधारणतः पाच वर्षे आपण पावसाची अतिशय अनियमितता अनुभवतोय. 2020 पर्यंत हीच परिस्थिती कायम राहणार आहे. 2020 पर्यंत आपल्याला दुष्काळाशी मुकाबला करायचा आहे, हे लक्षात घेऊनच पडलेल्या पावसाच्या पाण्याचा काटेकोर, नियोजनबध्द आणि जपून वापर करणे, कमी पाण्यावरील पिके आणि पिके घेण्याचा पॅटर्न बदलण्याची आपल्याला गरज आहे.

(लेखक एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र संभाजीनगर येथील संचालक आहेत.)
शब्दांकन – संजय मिस्त्री

summary-article on rain by shrinivas aundhkar