वाढत्या शहरीकरणामुळे पायाभूत सुविधांचा प्रश्न गंभीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई 

जागतिक लोकसंख्येच्या 50 टक्के लोक सध्या शहरात राहत असून हा आकडा 2050 पर्यंत 60 टक्क्यांहून अधिक होणार आहे. वाढत्या शहरीकरणाचा देशाला आर्थिकदृष्टय़ा फायदा होत असला तरी पायाभूत सुविधांसह दळणवळणाची साधने, गृहनिर्माण, स्वच्छता, आरोग्यसेवा, शैक्षणिक सुविधा, आर्थिक विषमता, गुन्हेगारी, प्रदूषण आदी प्रश्न गंभीर बनत चालल्याचे मत शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केले आहे.

न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्र महासभेच्या 73 सत्रात खासदार अरविंद सावंत यांनी ‘मानव वसाहती, गृहनिर्माण, कायमस्वरूपी नागरी विकास, शाश्वत शहरीकरण आणि संयुक्त राष्ट्र आवास योजना सशक्तीकरणासंबंधित महासभेतील चर्चेच्या निष्पत्तीची अंमलबजावणी’ या विषयावर हिंदुस्थानच्या वतीने निवेदन केले. त्याप्रसंगी त्यांनी शहरीकरणामुळे होणारे फायदे आणि आव्हाने नमूद केली. जगातील एक षष्ठांश लोकसंख्या हिंदुस्थानमध्ये राहत असून येथे जलद आर्थिक विकास आणि दारिद्रय़ निर्मूलनात शहरीकरण महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच देशाचा दोनतृतीयांश जीडीपी  व 90 टक्के सरकारी महसूल शहरी भागातून मिळतो. त्या पार्श्वभूमीवर वेगाने होणारे शहरीकरण व त्याच्या व्यवस्थापनाबाबत देशात केल्या जाणाऱया नावीन्यपूर्ण, गतिशील प्रयत्नांची माहिती दिली. तसेच शहरीकरणाबाबत हिंदुस्थानचे सुरू असलेले प्रयत्न नवीन शहरीकरणाच्या प्रस्तावातील आंतरराष्ट्रीय प्रयत्नांशी जुळणारे असल्याचेही नमूद केले. भविष्यात येणाऱया आव्हानांबाबत हिंदुस्थान जागरूक असून महात्मा गांधींच्या 2019 मध्ये येणाऱया जयंतीपूर्वी खुले मलविसर्जनमुक्त आणि घनकचरा व्यवस्थापनाबाबत राबवल्या जात असलेल्या व्यापक स्वच्छता मोहिमेबाबतही सावंत यांनी सभागृहास माहिती दिली. तसेच प्रधानमंत्री आवास योजना, सर्वांना परवडण्यायोग्य गृहनिर्माण योजनेबाबतही त्यांनी सांगितले.

शहरांवरील ताण कमी करण्यासाठी प्रयत्न
शहरांवर पडणारा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी हिंदुस्थानात दणवळणाच्या सुविधा उभारणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करणे, विमानतळ, रेल्वेमध्ये लक्षणीय सुधारणा केल्या जात आहेत. छोटय़ा शहरांमध्ये उद्योगधंदे वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असल्याचेही खासदार अरविंद सावंत यांनी स्पष्ट केले.