
सामना प्रतिनिधी। मालवण
मालवण वायरी-भूतनाथ वराडकरवाडी येथे डेंग्यूमुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. नीता चंद्रकांत साळुंखे (52) असे या महिलेचे नाव आहे. नीता यांच्यावर गेले आठ दिवस खासगी तसेच ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र रविवारी सकाळी त्यांचे निधन झाले. दरम्यान, डेंग्यू तापाने महिलेचा बळी घेतल्याने मालवण तालुक्याच्या आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
नीता यांना आठ दिवसांपूर्वी ताप आल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात त्यांची तपासणी करण्यात आली असता त्यांना डेंग्यू तापाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले . त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतल्यावर त्यांना पुन्हा खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे काही दिवस उपचार घेत असताना प्रकृती खालावल्याने डॉक्टरांच्या सूचनेनुसार शनिवारी त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना पुन्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र नीता यांची प्रकृती चिंताजनक असल्याने वैद्यकीय अधिकारी बालाजी पाटील यांनी त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याची सूचना केली होती. मात्र नातेवाईकांनी नीता यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू ठेवले. मात्र आज सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास नीता यांचा मृत्यू झाला.




























































