
सामना प्रतिनिधी । पणजी
गेले 29 दिवस दिल्ली येथील एम्स मध्ये उपचार घेत असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर प्रकृती सुधारलेली नसताना देखील आज सायंकाळी वायुदलाच्या विशेष हवाई अम्बुलेंसने गोव्यात पोचले. पर्रीकर प्रथमच विमानतळा वरुन अम्बुलेंस मधून आपल्या दोनापावल येथील घरी दाखल झाले.
अमेरिकेत तिसऱ्यांदा उपचार घेऊन आल्या नंतर पुन्हा प्रकृती बिघडल्या नंतर पर्रीकर यांनी आपले नातेवाईक असलेल्या कांदोळी येथील दुकळे हॉस्पिटल मध्ये 4 दिवस उपचार घेणे पसंत केले होते. 16 सप्टेंबर रोजी दिल्लीला जाण्यापूर्वी पर्रीकर यांनी आघाडी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करून आपल्या आजारपणा मुळे राज्य कारभारावर होत असलेल्या परिणामा बाबत चर्चा केली होती शिवाय भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे मुख्यमंत्री पद सोडण्याची इच्छा बोलून दाखवली होती.
16 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचने नुसार त्यांनी पाठवलेल्या विशेष विमानने पर्रीकर यांना दिल्ली येथील एम्स मध्ये दाखल करण्यात आले होते. पर्रीकर एम्स मध्ये 45 दिवस उपचार घेऊनच परत येतील असे त्यावेळी सांगितले जात होते. त्यामुळे भाजपने 3 निरीक्षक पाठवून पर्रीकर यांच्या गैर हजेरीत सरकार कसे चालवायचे याचा आढावा घेतला होता. त्यानंतर आजारपणावर उपचार घेत असले तरी मुख्यमंत्री पदी पर्रीकर हेच राहतील असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी जाहिर केले होते.
पर्रीकर यांच्याकडे जवळपास 32 खाती आहेत. त्यातील काही खाती इतर मंत्र्यांना देऊन त्यांच्या वरील भार कमी करण्याचे भाजप नेत्यांनी ठरवले होते .त्याच साठी पर्रीकर यांनी 12 ऑक्टोबर रोजी आघाडी पक्षाच्या नेत्यांना एम्स मध्ये बोलावून त्यांच्यासोबत चर्चा केली होती. दसऱ्या नंतर हे खातेवाटप होईल अशी चर्चा होती. मात्र त्यापूर्वीच पर्रीकर गोव्यात दाखल झाल्याने आता पुढे काय होणार याचे उत्तर अद्याप मिळाले नाही.
मुख्यमंत्री आजारी असल्याने प्रशासन ठप्प झाल्याचा आरोप करत विरोधी पक्ष काँग्रेसने सरकारला घेरले आहे. भाजप मध्ये देखील नाराजीचा सुर उमटू लागला आहे. पर्रीकर यांची पकड़ ढीली पडत असल्याने राजकीय परिस्थिती अस्थिर बनत चालली आहे.
आज पर्रीकर गोव्यात दाखल झाले असले तरी त्यांची प्रकृती अजिबात ठीक नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. एम्स मधून त्यांना स्ट्रेचर वरुन नेतानाचा फोटो व्हायरल झाला आहे .त्याशिवाय पर्रीकर यांना वायुदलाच्या एयर अॅम्ब्युलेंसमधून गोव्यात आणावे लागले आहे. दाबोळी विमानतळा वरुन त्यांना प्रथमच अॅम्ब्युलेंसमधून मधून त्यांच्या दोनापावल येथील घरी आणण्यात आले. पर्रीकर यांच्यावर उपचार करण्यासाठी एम्सचे पथक त्यांच्या सोबत गोव्यात आले आहे. शिवाय त्यांच्या दोनापावल येथील घरी गोमेकॉने उपचारासाठी लागणारी सर्व साधने सज्ज ठेवली आहेत.
































































