
सामना ऑनलाईन । चेन्नई
दुसऱ्या धर्माचे धार्मिक स्थळ पाडून त्याजागी राम मंदिर उभारावे असे चांगल्या हिंदूंना वाटत नसल्याचे काँग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानावरुन वाद होण्याची चिन्हे आहेत. ‘द हिंदू लिटरेचर फॉर लाइफ’ फेस्टिवल आणि व्याख्यानमालेत ते रविवारी थरुर बोलत होते.थरूर यांच्या या वक्तव्यामुळे हिंदूंच्या मतांसाठी त्यांना चुचकारणारा काँग्रेस पक्ष अडचणीत सापडला आहे, काँग्रेसने थरूर यांच्या वादग्रस्त विधानापासून फारकत घेत ते त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे स्पष्टीकरण केले आहे.
राहुल गांधी हिंदू आहेत की नाही? भाजपचा सवाल
समस्त हिंदू समाजाला वाटते तसे एक हिंदू म्हणून मलाही यापूर्वी राम मंदिर बाबरी मशीदीच्या जागीच व्हावे असे वाटायचे. अयोध्या ही रामजन्मभूमी आहे, असा मोठ्या प्रमाणावर हिंदूंचा विश्वास आहे. मात्र, चांगल्या हिंदूंना दुसऱ्याचे प्रार्थनास्थळ उद्ध्वस्त करुन त्याजागी राम मंदिर नको आहे, असे प्रतिपादन थरूर यांनी केले. राम मंदिर वादावर थरुर यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, हे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात आहे. त्यामुळे या क्षणी यावर भाष्य करण्याचा अधिकार कोणालाही नाही.
, आगामी निवडणुकीच्या काळात लोकांना मोठ्या प्रमाणावर धार्मिक विद्वेषाच्या वातावरणाचा सामना करावा लागू शकतो. आगामी काळात निवडणुका, धार्मिक मुद्दे आणि सांप्रदायिक दंगलींच्या पार्श्वभूमीवर आपल्याला पुढील काळात काही अप्रिय घटनांचा समाना करावा लागू नये याची मला काळजी वाटते, असेही थरूर यावेळी म्हणाले. रामजन्मभूमीच्या जागेवर राम मंदिर उभारण्यासाठी ज्या हिंदू संघटनांनी कमिटीची स्थापना केली आहे, त्या संघटनांवरही थरुर यांनी यावेळी टीका केली.
‘ते’ थरूर यांचे व्यक्तीगत मत – काँग्रेस
अयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मशीद प्रकरणी काँग्रेसचे मत ठाम आहे . याप्रकरणी सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल तो पक्षाला मान्य असेल. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी केलेले राम मंदिराबाबतचे वक्तव्य हे त्यांचे व्यक्तिगत मत आहे .त्याचा पक्षाच्या धोरणाशी काहीही संबंध नाही असे स्पष्टीकरण करीत काँग्रेस प्रवक्ते आरपीएन सिंग यांनी थरूर यांच्या वक्तव्यापासून फारकत घेण्याचे संकेत दिले.





























































