
सामना प्रतिनिधी । मुंबई
मोनो रेलचा वडाळा-जेकब सर्कल हा दुसरा टप्पा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला असतानाच त्यात सुरक्षेचा अडथळा निर्माण झाला आहे. या टप्प्यातील स्थानकांवर बॉम्ब आणि स्फोटके शोधणारे स्कॅनर बसवण्यासाठी अद्याप कुणीही कंत्राटदार पुढे आलेला नाही. त्यामुळे या कामासाठी दुसऱयांदा निविदा काढण्याची वेळ मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर (एमएमआरडीए) आली आहे. वडाळा ते जेकब सर्कल मोनो रेल येत्या फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. या टप्प्यातील प्रत्येक स्थानकावर एक्स्प्लोझिव्ह स्कॅनर आणि बॉम्ब सप्रेशन ब्लँकेट्स लावायचे आहेत. तसेच स्थानकांवरील संशयित वस्तूंची तपासणी करण्यासाठी एक्स्प्लोझिव्ह डिटेक्टर्स आणि सामान तपासणीसाठी एक्स-रे यंत्रणाही घेतली जाणार आहे. त्यासाठी कंत्राटदारांची प्रतीक्षा आहे. जुलै महिन्यात त्यासाठी निविदाही काढण्यात आल्या. परंतु कुणीही कंत्राटदार पुढे आला नाही. त्यामुळे पुन्हा निविदा काढल्या गेल्या असून त्यांना प्रतिसाद लाभेल अशी आशा एमएमआरडीएला आहे.
मोनो रेलच्या दुसऱया टप्प्यातील स्थानकांवरील सुरक्षेसाठी एमएमआरडीएने 4 कोटी रुपयांचे अंदाजित बजेट ठेवले आहे. गेल्या एप्रिल महिन्यात मोनो रेलच्या या टप्प्याचे सुरक्षा प्रमाणपत्र एमएमआरडीएला मिळाले. परंतु अद्याप सुरक्षा व्यवस्थेचा चोख बंदोबस्त व्हायचा बाकी आहे. तसेच मोनो रेलच्या सुटय़ा भागांची खरेदीही अद्याप व्हायची आहे.
भुयारी मेट्रो मार्गाचा शेवटची टीबीएम (टनेल बोअरिंग मशिन)आजपासून कार्यरत झाल्याने एकूण सतरा टीबीएम मशिन कार्यरत झाल्या आहेत. पॅकेज तीन मधील तानसा-2 ही टीबीएम मशिन वरळीच्या सायन्स म्युझियम येथे भूगर्भात सोडण्यात आली आहे. पहिली टीबीएम मशिनचे शाफ्ट 2017 रोजी नयानगरजवळ भूगर्भात सोडण्यात आली. त्यानंतर आता पॅकेज तीन तानसा -2 ही टीबीएम कार्यरत झाल्याने कुलाबा-बीकेसी-सिप्झ हा 33.5 कि.मी.चा भूयारी मार्ग खणण्यासाठी 17 मशिन कार्यरत झाल्या आहेत. 33.5 कि.मी.चा मार्ग असला तरी प्रत्यक्षात 54 किमी. भूयार खणावे लागणार आहे. 17 टीबीएम मशिन पैकी 15 मशिननी सुरूवातीचा टप्पा पूर्ण केला आहे. तर 9 टीबीएम ह्या मुख्य टप्पा सुरू केला आहे.
































































