
सामना ऑनलाईन । मुंबई
पिण्याचे पाणी वाहून नेण्यासाठी असणारे पालिकेचे टँकर, घनकचरा वाहून नेणारे कॉम्पॅक्टर्स, इमारतींच्या विकास प्रक्रियेदरम्यान तयार होणार राडारोडा किंवा नालेसफाईतील गाळ वाहून नेणारी वाहने अशा सर्व गाड्यांवर यापुढे पालिकेचा वॉच राहणार आहे. या गाड्या ठरलेल्या मार्गाने ठरलेल्या आणि ठरलेल्या ठिकाणीच जात आहेत की नाही हे पाहण्यासाठी या सर्व गाड्यांवर व्हीटीएमएस सिस्टम बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
महापालिकेशी संबधित विविध नागरी सेवासुविधाविषयक कामांसाठी महापालिकेला आपल्या गाड्यांबरोबर खासगी वाहनांचीही आवश्यकता असते. या वाहनांमध्ये टँकर, घनकचरा वाहून नेणारे कॉम्पॅक्टर्स अशा गाड्यांचा समावेश असतो. मात्र अनेकदा कंत्राटदार गैरव्यवहार करत असल्याचे आढळून आले आहे. नालेसफाईच्या कामात कंत्राटदारांनी एकाच गाडीच्या असंख्य फेऱ्या दाखवल्या होत्या. त्यानंतर पालिकेने नालेसफाईचा गाळ वाहून नेणाऱ्या गाड्यांवर व्हीटीएस यंत्रणा बसवली होती. अशीच यंत्रणा आता सर्वच गाड्यांवर बसवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
चोवीस तास चालणारा मध्यवर्ती नियंत्रण कक्ष
पालिकेशी संबंधित विविध यंत्रणांसाठी वापरण्यात येणाऱ्या सुमारे 7 हजार 811 वाहनांमध्ये ‘व्हीटीएमएस’ उपकरण असणे बंधनकारक करण्यात आले आहे. या सर्व वाहनांच्या मार्गांचे व फेऱ्यांचे संनियंत्रण करण्यासाठी 24 तास चालणारा स्वतंत्र नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. ‘व्हीटीएमएस’ उपकरण असलेली वाहने आपल्या निर्धारित जागी व निर्धारित मार्गानुसारच जात असल्याचे संनियंत्रण ‘जीपीएस’च्या आधारे करण्यात येणार आहे.



























































