नांदेडमध्ये लाचखोर तलाठ्याला रंगेहात पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रतिनिधी । नांदेड 

वारसा हक्काप्रमाणे शेती नावावर करण्यासाठी सात हजार रुपये लाच घेणार्‍या बिलोली येथील तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. या प्रकरणी बिलोली पोलीस ठाण्यात तलाठ्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

आईच्या नावावरील कुंडलवाडी येथील शेती वारसा हक्काप्रमाणे कुटुंबीयांच्या नावे करण्यासाठी बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी सज्जाचे तलाठी माणिक सदबा उमरे यांनी तक्रारदाराकडे दहा हजार रुपये लाच म्हणून मागितली होती. या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता १७ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तलाठी माणिक उमरे यांच्या खासगी कार्यालयात पंचासमक्ष लाचेची पडताळणी केली होती. तलाठी उमरे यांनी तक्रारदाराकडून दहा हजार रुपये मागितले होते. शेवटी त्यांनी सात हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून तलाठी माणिक उमरे यांना तक्रारदाराकडून सात हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडले.

या प्रकरणी बिलोली पोलीस ठाण्यात तलाठी माणिक उमरे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक संजय लाठकर, पोलीस उपअधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बी.एच.काकडे, कपिल शेळके, पोना. शेख चाँद शेख अली, मारोती केसगीर, हणमंत बोरकर, जगन्नाथ अनंतवार, अमरजितसिंह चौधरी आणि माधव डुकरे यांच्या पथकाने पार पाडली.