
सामना प्रतिनिधी । नगर
श्री साई समाधी शताब्दी समाप्ती सोहळ्यासाठी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिर्डीत येणार आहेत. यावेळी करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांवर कोटय़वधी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत घरकुल मिळालेले लाभार्थीही शिर्डीतील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. नगरसह पाच जिह्यांतील 40 हजार लाभार्थी शिर्डीत येत आहेत. हे लाभार्थी सरकारी खर्चाने शिर्डी येणार असून, त्यासाठी तब्बल दोन कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित राज्यातील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ग्रामीण भागात पूर्ण झालेल्या घरकुलांचा गृहप्रवेश कार्यक्रम ऑनलाइन होणार आहे. त्यासाठी नाशिक, नगर, संभाजीनगर, बीड, पुणे जिह्यांतील 40 हजार लाभार्थ्यांना शिर्डीत आणण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने नियोजन केलेले आहे. या लाभार्थ्यांना शिर्डीला आणण्यासाठी 800 एसटी बसचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी दोन कोटी रुपयांचा खर्च ग्रामीण विकास विभागाने मंजूर केला आहे. एसटी बसला दीड कोटी रुपये भाडे दिले जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातून 20 हजार लाभार्थी 400 बसमधून, नगर जिह्यातून 12 हजार लाभार्थी 240 बसने, संभाजीनगर जिह्यातील 4 हजार लाभार्थी 80 बसने, बीड जिह्यातील दोन हजार लाभार्थी 40 बसने, पुणे जिह्यातील दोन हजार लाभार्थी 40 बसने शिर्डीत येणार आहेत. 20 हजार घरकुले देण्यात आली असल्याने हे लाभार्थी कुटुंब सदस्यांसमवेत उपस्थित राहणार आहेत. एका घरकुलामागे दोन अशा 40 हजार लाभार्थ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या लाभार्थ्यांना ओळखपत्र देणार आहे. प्रत्येक एसटीला पंतप्रधान आवास योजनेचा एक बॅनर असणार आहे. शिर्डीला येणाऱ्या लाभार्थ्यांच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी एका व्यक्तीला शंभर रुपये खर्च येणार आहे. जिल्हा विकास यंत्रणेने लाभार्थ्यांसाठी खर्च केल्यानंतर खर्चाचे बिले कार्यालयास सादर करण्यात येणार आहे. याबाबत ग्राम विकास विभागाच्या ग्रामीण गृहनिर्माण यांच्या कार्यालयामार्फत सर्व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला पत्र देऊन सूचना देण्यात आल्या आहेत. त्या पत्रात सर्व खर्चाला मंजुरी देण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
अडीच तास पंतप्रधान शिर्डीत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साई समाधी शताब्दी सांगता सोहळ्यासाठी शुक्रवार दि. 19 रोजी सकाळी 10 वाजता काकडी साईबाबा विमानतळावर त्यांचे आगमन होणार असून, दहा वाजता ते मंदिरात जाऊन दर्शन घेतील. त्यानंतर यावेळी साईबाबांवरील नाण्याचे प्रकाशन केले जाईल. दर्शन बारी व शैक्षणिक संकुलाचे भूमिपूजन व साईंच्या जीवनचरित्र्यावर होणाऱ्या प्रकल्पाचे भूमिपूजन मोदींच्या हस्ते केले जाणार असल्याचे संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी सांगितले. विविध विकासकामांच्या शुभारंभानंतर पंतप्रधानांची जाहीर सभा होईल. यादरम्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अडीच तास शिर्डीत थांबणार आहेत. त्याच्या सभेसाठी एक लाख नागरिक बसतील, असा भव्य मंडप उभारण्यात आला आहे. सभास्थळाच्या दोन्ही बाजूने महामार्गालगत पार्ंकगची ठिकठिकाणी सुविधा करण्यात आली असून, वाहतूक बाह्यवळण रस्त्याने वळविण्यात आली आहे. घरकुल पंतप्रधान मोदी साई मंदिरात दर्शन घेण्यासाठी येण्याअगोदर साई मंदिर काहीकाळ बंद राहील, असे हावरे यांनी सांगितले.
तगडा पोलीस बंदोबस्त; मंदिर परिसरात ‘नो मॅन झोन’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी बंदोबस्तासाठी एक पोलीस अधीक्षक, 9 पोलीस उपअधीक्षक, 17 उपविभागीय पोलीस अधिकारी, 50 पोलीस निरीक्षक, 150 पोलीस उपनिरीक्षक, 2500 पोलीस कर्मचारी, 2 एसआरपीएफच्या तुकडय़ा, 4 एटीएस टीम, 9 बॉम्बशोधक पथक, 8 शीघ्र कृती दल पथक, 6 दंगल नियंत्रक पथक, 25 व्हीडीओ कॅमेरे, 250 सीसीटीव्ही कॅमेरे व वरिष्ठ अधिकारी शिर्डीत तळ ठोकून आहेत. पंतप्रधानांच्या दर्शनावेळी परिसरात ‘नो मॅन झोन’ करून काहीकाळासाठी काही रस्त्यांवरील वाहतूकही बंद केली जाणार असल्याचे जिल्हा पोलीसप्रमुख रंजन कुमार शर्मा यांनी सांगितले.



























































