गावठी कट्ट्यासोबत खेळताना गोळी सुटून बालकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । राहुरी

घरात ठेवलेल्या गावठी कट्टय़ासोबत खेळताना चुकून गोळी उडाल्याने 12 वर्षांचा चिमुकला मुलगा जागीच ठार झाल्याची घटना राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात घडली. याप्रकरणी मृत मुलाच्या चुलत्याविरोधात राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य भैरवनाथ मोरे (12) असे मृत बालकाचे नाव आहे. नवनाथ नामदेव मोरे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. मुलाची आई जया मोरे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आदित्य घरात खेळत असताना गावठी कट्टा त्याच्या हाती लागला. कट्टय़ाचा ट्रिगर दाबताच गोळी छातीच्या उजव्या भागातील बरगडीत घुसल्याने आदित्य जमिनीवर कोसळला. दरम्यान, गोळीबार झाल्याचा आवाज झाल्याने बाहेर असलेल्या नातेवाईकांनी घराकडे धाव घेतली. या घटनेची खबर परिसरात पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती.