
सामना प्रतिनिधी । मुंबई
रेल्वे परीक्षेतून डावललेल्या 200 मराठी तरुणांना पुन्हा परीक्षा देता येणार आहे. परीक्षेवेळी काही कागदपत्रे नसल्याने त्यांना परीक्षेस बसू दिले गेले नव्हते. शिवसेनेने या अन्यायाविरुद्ध रेल्वे भरती मंडळाच्या अध्यक्षांची भेट घेऊन या उमेदवारांची पुन्हा परीक्षा घेण्यात यावी असा आग्रह धरला होता.रेल्वेतील ग्रुप डी पदासाठी भरती परीक्षा पुण्याच्या नऱहे येथे होती. सुमारे 200 मराठी तरुणांकडे काही कागदपत्रे नसल्याने त्यांना त्या परीक्षेला बसण्यास मज्जाव करण्यात आला होता. या अन्यायाविरुद्ध स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे सरचिटणीस, शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई यांनी रेल्वे भरती मंडळाचे अध्यक्ष गोपाल चंद्रा यांची भेट घेतली होती. डावललेल्या मराठी उमेदवारांची पुन्हा परीक्षा घेण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा खासदार देसाई यांनी दिला होता.
शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यानंतर चंद्रा यांनी तातडीने निर्णय घेत या मराठी तरुणांची पुन्हा परीक्षा घेतली जाईल असे लेखी पत्र खासदार देसाई यांना पाठवले. त्यानुसार उमेदवारांनी योग्य ओळखपत्रासह आरआरबी, मुंबई यांना 25 ऑक्टोबरपूर्वी आपले अर्ज स्पीड पोस्टने ‘रेल्वे रिक्रूटमेंड बोर्ड, डिव्हिजन ऑफिस, मुंबई सेंट्रल, मुंबई – 400008’ या पत्त्यावर पाठवायचे आहेत किंवा [email protected] या पत्त्यावर ई-मेल करायचे आहेत. या अर्जांची पडताळणी केल्यानंतर परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी उमेश नाईक (9869046036), बापू पाटील (9987457901), अरुणकुमार दुबे (9887332828) किंवा मोहन दुधाने, पुणे (9422008922) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.






















































