…जाईन विचारत रानफुला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुर्गेश आखाडे,[email protected]

घाटमाथ्याप्रमाणे कोकणातील आडवाटांवर रंगीबेरंगी फुलांचे संमेलन भरले आहे. कोकणातील कातळावर पावसाच्या शिंतोडय़ानंतर रानफुले उगवायला सुरुवात होते, श्रावणानंतर रानफुलांनी माळरान बहरुन जातं. पायदळी तुडवलेली रानफुलेही निळयाभार आकाशाखाली कोकणाच्या निसर्गसौंदर्यात भर घालत आहेत. लाल, निळ्या, पिवळ्या, हिरव्या आणि जांभळ्या रंगाची उधळण ही रानफुले करत आहेत.

उन्हाळय़ात ज्या कातळावर पाऊलही ठेवत नाही ती कातळं आणि आजूबाजूच्या माळरानावरील पावसाळय़ात उगवणारी रानफुलं पर्यटकांची पावले आपल्याकडे खेचत आहेत. रानफुलांच्या माध्यमातून कोकणातील कातळावरची जैवविविधता आपल्याला पहायला मिळते. कोकणात उजाड डोंगर, माळरान आणि कातळ आहे असं म्हणणाऱया मंडळींना पावसाळय़ात उगवणारी ही रानफुलं कोकणातील जैवविविधतेचा अभ्यास करायला लावतात. रानफुलांनाही वैशिष्टय़पूर्ण नावे आहेत. निळय़ा रंगाचे फूल असलेली अतिशय नाजूक ही रानफुलांची वनस्पती अनेक ठिकाणी आढळते. ती वनस्पती सीतेची आसवं नावाने ओळखली जाते. निळयागार आकाशाखाली तिची निळाई काही लपत नाही. पिवळय़ा रंगाची सोनसळ कातळ बहरुन टाकते. कोकणात बहुतांश भाग हा सोनसळच व्यापून टाकते. पिवळय़ा रानमाळावरच आपण विहार करत आहोत असा भास निर्माण करणारी आणि कास पठारावरच्या रानफुलांमध्ये बागडल्याचा आनंद देणारी ही सोनसळ अतिशय मनमोहक. कुर्डू नावाचे रानफुलही पावसाळय़ात उगवतं. दसऱ्यायाच्या वेळी दारावर लावण्यात येणाऱया पवित्र अशा तोरणामध्ये या कुर्डूचा वापर होतो. त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी पुजेसाठी काही रानफुलं गोळा केली जातात. त्यामध्ये गोमटी, दुर्वा, सोनसळसारख्या वनस्पती प्रामुख्याने दिसतात.

रानतेरडा हे एक रानफूल उगवते.गणेशोत्सवात गौरीच्या आगमनाच्या दिवशी तेरडय़ाची पुजा केली जाते. ज्या दुर्गम गावांमध्ये पुजेसाठी फुले उपलब्ध होत नाहीत त्यांच्या घरातील देव्हारा यात या रानफुलांना जागा मिळते. श्रावण भाद्रपद या महिन्यात हिरवा पिवळसर आणि लाल असा रंग धारण केलेले फूल आपल्या नजरेत येते. ही फुले भाद्रपद महिन्यात गौरीगणपतीच्या वेळी मोठय़ा प्रमाणात उगवत असल्यामुळे त्याला गौरीचे हात असा असेही त्याला संबोधतात. हिरवालाल देठ आणि रंगीत अर्धवट मिटलेल्या पाकळय़ा असे सुंदर रुप ही फुले धारण करतात. या फुलांचा रंगही हळूहळू बदलत जातो. त्यामुळे प्रत्येक फुलाचा जसा सुगंध आहे तसाच माणसाच्या जीवनाशी संबंधही आहे.

कोकणाच्या कातळावर रंगीबेरंगी रानफुलांचे संमेलनच भरल्याची अनुभूती येते. पावसाळय़ाप्रमाणे उन्हाळय़ामध्येही अनेक रानफुले उगवतात. करवंदाची चांदणफुलेही अनेकांनी पाहिली आहेत. चविष्ट असलेली ही रानफुले खाणाऱयांची संख्याही काही कमी नाही. पावसाळा संपला की कोकणातील घराभोवती घाणेरी या रंगीबेरंगी रानफुले पहायला मिळतात. पावसाळय़ानंतर रानमोडी ही वनस्पती वेगाने वाढते. ही वनस्पती कोकणात मोठय़ा प्रमाणात दिसून येते. कोकणातील देवराईतल्या सुरंगीच्या झाडाला इवलीइवलीशी फुले येतात. साहित्यिकही या सुरंगीच्या फुलाच्या प्रेमात पडलेले दिसतात. मार्च ते जून या काळात शेवरीची झाडे फुलांनी बहरुन निघतात. लाल रंगांची ही फुले सौंदर्याची उधळण करतात.कारवीची निळाई ही अनेकांना भावते,हि वनस्पती औषधी वनस्पती म्हणूनही ओळखली जाते.