
सामना ऑनलाईन । नांदेड
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगरमध्ये एक अत्यंत भयंकर घटना घडली आहे. एका निर्दयी आणि दारुड्या बापाने आपल्या पोटच्या अडीच वर्षाच्या मुलीची अत्यंत क्रूरपणे भिंतीवर आपटून हत्या केली आहे. अनुराधा असे या चिमुकलीचे नाव असून, तिच्या हत्ये प्रकरणी बाप प्रभाकर इंगळे याला पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
हिमायतनगर तालुक्यातील वाघी गावात प्रभाकर त्याची पत्नी आणि दोन मुलींसह राहत होता. गेल्या काही दिवसापासून दारुच्या आहारी गेल्याने प्रभाकर आणि त्याच्या पत्नीमध्ये नेहमीच वाद होत होते. बुधवारी देखील दोघांध्ये कडाक्याचे भांडण झाले, यावेळी पत्नीच्या कडेवर अडीच वर्षाची अनुराधा होती. रागाच्या भरात नशेत तर्राट असलेल्या प्रभाकरने पत्नीत्या कडेवरील अनुराधाला हिसकावून घेतले आणि ग्रामपंचायत कार्यालयाच्या भिंतीवर आपटले. त्यामुळे अनुराधाच्या डोक्याला जबर मार लागल्याने ती बेशुद्ध झाली. तिला उपचारासाठी नांदेडला नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेप्रकरणी मयत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपी प्रभाकरला अटक केली आहे.





























































