पंतप्रधानांनी दहा वर्षांत सार्वजनिक उपक्रम बुडीत काढले! पंतप्रधानांनी दहा वर्षांत सार्वजनिक उपक्रम बुडीत काढले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधानांनी अलीकडेच देशातील उद्योजकांना आमंत्रित केले आणि जीएसटीमध्ये सूट दिली असतानाही बेरोजगारांना नोकऱ्या का दिल्या नाहीत, असा प्रश्न विचारला. वास्तविक या परिस्थितीला पंतप्रधानच जबाबदार आहेत. त्यांनी गेल्या दहा वर्षांत अनेक सार्वजनिक उपक्रम बुडीत काढले आणि लाखो लोकांचे रोजगार हिरावून घेतले, अशा शब्दांत शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. महानगर टेलिफोन निगमच्या मुख्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी केलेल्या निदर्शनावेळी त्यांनी सरकारवर टीका केली.

महानगर टेलिफोन निगम लिमिटेड आणि भारत संचार निगम लिमिटेडमध्ये यापूर्वी लाखो कर्मचारी होते. आता हाताच्या बोटावर मोजण्याइतके कर्मचारी काम करीत आहेत. त्यामुळे ‘आधी कंपन्या जगवा आणि कर्मचाऱ्यांना जगवा’ असा सणसणीत टोला खासदार सावंत यांनी पंतप्रधानांना लगावला. मुळात सरकारच्या धोरणामुळेच दोन्ही कंपन्या तोट्यात जात आहेत. दहा वर्षे लोटल्यानंतरही वेतनात वाढ झाली नाही म्हणून तृतीय वेतन सुधार आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी महानगर टेलिफोन निगमचे कर्मचारी आंदोलन करत आहेत, असे ते म्हणाले. याप्रसंगी महानगर टेलिफोन निगम कामगार संघाचे पदाधिकारी प्रकाश शिरवाडकर, दिलीप जाधव, जयदत्त आसरोंडकर, सुधाकर सावंत, दिलीप (बाळा) साटम, प्रदीप परब, सूर्यकांत मुद्रस, किशोर खेवलकर, संजय ढोलम, महेश धुरी, मधुकर घाडी, शरद गिते, अनिल काते तसेच महिला आघाडीच्या पदाधिकारी कल्याणी सावंत, मनाली सावंत आणि उमादेवी मनोली व बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते.

‘आत्मनिर्भर’च्या लोभस घोषणेने कंपन्या सक्षम झाल्या नाहीत!

एमटीएनएलची मालमत्ता विकून त्यातून कोटय़वधी रुपये केंद्र सरकारच्या तिजोरीत जात आहेत. त्याचा उपयोग सेवा सुधारणेसाठी केला नाही. सेवा विस्कळीत होत असल्याने ग्राहक एमटीएनएल-बीएसएनएलला सोडून जात आहेत. दुसऱया बाजूला या मालमत्ता विक्रीतून निधी उभारला जात असल्याने एमटीएनएलच्या शेअर्सचे भाव शेअर बाजारात उसळी घेताहेत. हे नक्की काय गौडबंगाल आहे? आत्मनिर्भर नावाच्या लोभस घोषणेने कंपन्या सक्षम न होता स्पर्धात्मक बाजारपेठेत मागे पडतात. याला पंतप्रधानांचे आत्मनिर्भर धोरणच कारणीभूत आहे, असा हल्ला सावंत यांनी यावेळी केला.