
कोकणातली संस्कृती, परंपरा, मालवणी खाद्य तसेच दशावतार या लोककलेचा सहभाग असलेल्या मालवणी जत्रोत्सवाचे आयोजन उद्या, 28 नोव्हेंबरपासून करण्यात आले आहे. शिवसेनेच्या वतीने आयोजित हा महोत्सव 6 डिसेंबरपर्यंत अनंतराव भोसले मैदान, मागाठाणे, जय महाराष्ट्र नगर, बोरिवली पूर्व येथे सुरू राहणार आहे.
शिवसेना शाखा क्र. 12 तर्फे आयोजित तसेच शाखा क्र. 14 आणि मागाठाणे मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने होणाऱया या महोत्सवानिमित्त यंदा सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले तालुक्यातील वजराट येथील प्रसिद्ध श्री देव गिरेश्वर मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. मूर्तिकार नंदकिशोर शिवलकर व बंटी सावंत यांनी ही प्रतिकृती साकारली आहे. महोत्सवाचे उद्घाटन शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, उपनेते विश्वनाथ नेरूरकर, माजी आमदार विलास पोतनीस यांच्या हस्ते होणार आहे.
मालवणी महोत्सवास शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई, शिवसेना नेते ऍड. अनिल परब, शिवसेना सचिव विनायक राऊत, शिवसेना नेते-आमदार सुनील प्रभू आदी उपस्थित राहणार आहेत.
महोत्सवाचे आयोजक स्थानिक नगरसेविका सारिका झोरे, शाखाप्रमुख सचिन मोरे, अभिलाष कोंडविलकर, शाखा संघटक माधुरी खानविलकर, शाखा संघटक वनिता दळवी, शाखा समन्वयक इतिश्री महाडिक, योगेश देसाई, अमित मोरे, संजय जोजन, साक्षी सुर्वे, मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार मोरे, सुभाष देसाई, वसंत सावंत, हेमंत पाटकर, दिलीप चव्हाण, दिलीप देसाई, मनोज सनाणसे आहेत.

























































