
सामना प्रतिनिधी । मुंबई
दरवाढ सरकारच्या हातात नाही असे मग्रूरपणे सांगणाऱया केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनाही उद्धव ठाकरे यांनी लक्ष्य केले. भाववाढ, महागाई तुम्ही रोखू शकत नाही, महिलांवरील अत्याचार रोखू शकत नाही, बेरोजगारांना नोकऱया देऊ शकत नाही मग तुमच्या हातात नेमके काय आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. विष्णूचा अकरावा अवतार तुमच्यात आहे. त्यांचे वाहन काय मला माहीत नाही तरीही महागाई रोखता येत नाही तर तुम्हाला येतंय तरी काय, असा सवाल त्यांनी केला.
वृत्तपत्रांमध्ये आज छापून आले, शिवसेना कोणता नारा देणार? अरे किती वेळा नारे द्यायचे, असा सवाल करून उद्धव ठाकरे म्हणाले, सत्तेमध्ये असूनसुद्धा विरोधी भूमिका घेता, मग तुम्ही बाहेर का नाही पडत अशी विचारणा शिवसेनेला केली जाते. जे पटत नाही ते बोलणे हा माझा धर्म आहे आणि तो मला माझ्या वडिलांनी शिकवला आहे. त्यामुळे आणखी कोणी राजकारण शिकवण्याच्या फंदात पडू नये असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.
आम्ही कानपिचक्या देत नाही, कानाखाली आवाज काढतो
आम्ही सरकारच्या विरोधात बोलत नाही असे सांगतानाच उद्धव ठाकरे यांनी उपस्थित जनसमुदायाला प्रश्न विचारला की, ‘जो कारभार या देशात, राज्यात सुरू आहे तो तुम्हाला मान्य आहे काय?’ त्यावर ‘नाही, अजिबात नाही’ असा जोरदार आवाज गर्दीतून घुमला. सरकारच्या विरोधात कुणी बोलले तर त्याला सरकारद्रोही, देशद्रोही ठरवले जाते, पण शिवसेना पहिल्या दिवसापासून जे बोलतेय तेच आता संघही बोलू लागला आहे. काही दिवसांपूर्वी भैयाजी जोशी बोलले होते. त्यांनी कान टोचले होते. कानपिचक्या दिल्या. पण आम्ही तसे पिचकत नाही तर थेट कानाखाली आवाज काढतो असे उद्धव ठाकरे म्हणाले. भैयाजी जोशी काय म्हणाले, तर या देशामध्ये प्रजेला सुखी ठेवण्याचे काम हे राजाचे असते. म्हणजेच संघालासुद्धा तुमचा कारभार पटत नाही. भाजपला सत्तेत बसवण्यात संघाचा हात होता. मग त्यांना बाहेर का काढत नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
2014 ची हवा आता बदललीय!
महागाई, महिला सुरक्षा, पाकिस्तान असे अनेक विषय आहेत. पण कशाकशावर बोलणार? ज्योतिषशास्त्र्ाावर बोलायचे तर सध्या देशाच्या पत्रिकेत वक्री झालेले शनी आणि मंगळ आहेत. हे शनी, मंगळ कोण आहेत हे सर्वांना माहीत आहे, पण त्यांचे वाहन कोणते हे विचारू नका (हशा). त्यांना सरळ करण्याची ताकद माझ्या शिवसैनिकांमध्ये आहे असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. हवामानावर बोलायचे झाले तर 2014 ची हवा आता राहिली नाही, ती बदलली आहे अशी खिल्लीही उद्धव ठाकरे यांनी उडवली. 2014 मध्ये देशामध्ये उधळलेला अश्वमेध आमच्या शिवरायांच्या महाराष्ट्राने पहिला अडवला आणि शिवसेनेने स्वतŠच्या बळावर 63 आमदार निवडून आणले, असे उद्धव ठाकरे यांनी अभिमानाने सांगितले.
एका रुपयाची किंमत 37 डॉलर्स व्हावी!
प्रमोद महाजन यांच्याशी ‘मातोश्री’वरील भेटीत झालेल्या चर्चेचीही आठवण यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितली. तुमचे देशाबद्दलचे स्वप्न काय, असा प्रश्न त्यावेळी महाजन यांनी मला विचारला होता. त्यावेळी डॉलरचा भाव 37 रुपये होता. ‘एका रुपयाची किंमत 37 डॉलर्स व्हायला हवी’ असे उत्तर आपण त्यावेळी दिले होते असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आज डॉलर 74 रुपये झाला आहे याचाही उल्लेख त्यांनी केला. मोदी म्हणतील, महाराज मराठी माणूस होता. छोटे सपने देखनेवाला. डॉलर 150 रुपये झाला की मी उलटा करेन, असे शालजोडीतलेही उद्धव ठाकरे यांनी हाणले.
थोडं ‘देसी बल’ वाढवा! भगव्याचा आवाज बंद करण्याची हिंमत कोणामध्येही नाही!
उद्धव ठाकरे बोलत असताना अचानक गर्दीमधून ‘आवाज…आवाज…’ अशी बोंब उठली. आवाजावरील मर्यादेमुळे उद्धव ठाकरे यांचा आवाज सर्वांपर्यंत पोहोचत नव्हता. त्यावेळी मिष्कीलपणे उद्धव ठाकरे यांनी ‘थोडं देसी बल वाढवा’ असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. ही सर्व बंधने आपल्यावरच आहेत. नवरात्री संपली, आज दसरा आहे, गणपती झाले. मला वाटलं होतं युद्धबंदी होईल पण युद्धबंदी केवळ रमजानमध्येच होते. गणपती, नवरात्री, दिवाळी आली की आमचेच नरडे दाबले जाते. आवाज बंद केला जातो. पण भगव्याचा आवाज बंद करण्याची हिंमत कोणामध्येही नाही असा भीमटोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. युद्ध सुरू असेल तर युद्धबंदी ठीक आहे. रमजानमधील युद्धबंदी कोणासाठी? पाकिस्तान की अतिरेक्यांसाठी, असा सवाल करतानाच उद्धव ठाकरे म्हणाले की, आपण रमजानच्या विरोधात नाही पण हिंदू सणांच्या वेळी फालतू बंद्या आणता त्या बंद करा.
आजच्या दराचे होर्डिंग लावून येईपर्यंत पेट्रोलचे दर वाढतात
पेट्रोल दरवाढीबद्दल संभाजीनगरमध्ये शिवसेनेने केलेल्या अभिनव आंदोलनाबद्दल उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. रोजचा पेट्रोल-डिझेलचा दर काय हे लोकांना कळावे म्हणून संभाजीनगरमध्ये प्रत्येक नाक्यावर होर्डिंग लावण्याचे आंदोलन शिवसेनेने केले होते, पण होर्डिंग छापून होईपर्यंत पेट्रोलचे भाव वाढायचे. त्यावर ‘डिजिटल बोर्ड लावा म्हणजे मटक्यासारखे रोज भाव बदलता येतील’ असे सांगावे लागल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
सावरकर पंतप्रधान असते तर पाकिस्तान शिल्लक राहिला नसता!
उद्धव ठाकरे यांनी कश्मीरप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाष्यावरही टीका केली. कश्मीर पेटला आहे यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकच उत्तर असते की, सरदार वल्लभभाई पटेल असते तर कश्मीर प्रश्न चुटकीसरशी सुटला असता. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, सावरकर असते तर पाकिस्तान शिल्लकच राहिला नसता. आता दोघेही नसल्याने त्यांच्या कार्यातून तरी स्फूर्ती घ्या असे ते म्हणाले. पाकिस्तान दहशतवादी कारवाया थांबवणार नाही तोपर्यंत त्यांच्याशी क्रिकेटही खेळणार नाही असे सांगितले गेले पण मॅच मात्र सुरूच आहेत असे ते पुढे म्हणाले.
हिंदुत्ववादी सरकार असताना माताभगिनींची विक्री होतेय
कैलास सत्यार्थी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मेळाव्यात मुलींच्या विक्रीच्या मुद्दय़ावर प्रकाश टाकला होता. मुलींची किंमत जनावरांपेक्षा कमी आहे असे भयंकर वास्तव सत्यार्थी यांनी मांडले होते. त्याचा अर्थ किंमत वाढावी असा नाही तर हिंदुत्ववादी सरकार सत्तेवर असताना माताभगिनींची विक्री होत असेल तर कशाला शिवाजी महाराजांचा आदर्श सांगायचा असे उद्धव ठाकरे म्हणाले.
‘मी टू’ प्रकरणात दोषी आढळणाऱयांना फासावर लटकवा
देशात सध्या चालू असलेल्या ‘मी टू’ मोहिमेवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील महिलांना धाडस दिले. ‘मी टू’ करण्याचा कुणी प्रयत्नही केला तर खाड्कन त्याच्या कानाखाली खेचा, शिवसेना तुमच्या पाठिशी आहे, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील मायभगिनींनी तसा आदर्शच देशासमोर ठेवायला हवा असे ते म्हणाले. ‘मी टू’ प्रकरणांमधील आरोपांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यात दोषी आढळणाऱयांना फासावर लटकवले पाहिजे असे ते म्हणाले.
2019 ला काय होणार?
महाराष्ट्रात आणि देशात सध्या खोटे बोलण्याचे प्रचारतंत्र सुरू आहे. 2025 पर्यंत प्रत्येकाला घर देणार, घरपोच दारू देणार अशा घोषणा केल्या जात आहेत. या सर्व घोषणा पूर्ण होणार का असे विचारले तर ‘असं बोलायचं असतं’ असे सांगतात. काही होणार नाही. पण निदान महाराष्ट्राने ठरवले पाहिजे की काय होणार? नाही, मी ठरवणारच असा निर्धार करत हाताच्या मुठी वळवून मला सांगा, आहे का धमक? असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी करताच उपस्थित जनसमुदायाने हाताच्या मुठी उंचावून गगनभेदी होकार दिला. शिवसेना ही मर्दांची संघटना असून महाराष्ट्रावरच नाही तर दिल्लीवरही भगवा फडकवणार असा निर्धार करा असे उद्धव ठाकरे म्हणाले.
नितीनजी! खोटं बोलणं महाराष्ट्राची संस्कृती नाही
खोटे बोलणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असे सांगत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरही निशाणा साधला. आमचे सरकार आले तर टोल माफ करू, अमुक करू अशी आश्वासने भाजपाने दिली होती. परंतु त्याची पूर्तता केलेली नाही. नितीनजी, तुम्ही महाराष्ट्राचे आहात, मराठी आहात, खोटे बोलणे ही महाराष्ट्राची संस्कृती अजिबात नाही. शिवसेनाप्रमुखांच्या शिकवणीत हे बसतच नाही. शब्द द्यायचा असेल तर लाख वेळा विचार कर, पण शब्द दिल्यावर प्राण गेला तरी मागे पाहू नकोस ही त्यांची शिकवण होती, असे उद्धव ठाकरे म्हणाले. नितीन गडकरी सांगतात की, ‘अच्छे दिन कधी येणार?’ असे लोक विचारतात तेव्हा आम्ही हसून पुढे निघून जातो. हा गडकरींचा स्पष्टवक्तेपणा असला तरी माझ्या मते तो निर्लज्ज, कोडगेपणा आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपाने खोटे बोलून देश ज्वालामुखीच्या तोंडावर नेऊन ठेवलाय, तो फुटला की पुन्हा तुम्ही सत्तेवर बसू शकत नाही, असा सावधगिरीचा इशाराही त्यांनी भाजपाला दिला.
370 कलम रद्द करण्याची हिंमत सरकारमध्ये नाही
370 कलम रद्द करण्याच्या मुद्दय़ावरही उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र्ा सोडले. देशाचा पंतप्रधानही या कलमामुळे कश्मीरमध्ये एक इंचही जागा विकत घेऊ शकत नाही. आमचे सरकार आल्यावर हे कलम रद्द करू, सर्व देश एक विचार करू असे आश्वासन भाजपाने दिले होते, पण आता एकामध्येही हे कलम रद्द करण्याची हिंमत नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले. 370 कलम रद्द करण्याचा ठराव लोकसभेत आणण्याचे धाडस दाखवा, शिवसेना ठामपणे तुमच्या पाठीशी उभी राहील असे आश्वासनही त्यांनी दिले. खोटे बोलून भाजपाने देश ज्वालामुखीच्या तोंडावर नेऊन ठेवला असून तो फुटला की पुन्हा भाजपा सत्तेवर बसू शकत नाही असा इशाराही त्यांनी दिला.
सरकार येईल आणि जाईल, पण देश टिकला पाहिजे!
उद्धव ठाकरे यांनी यावेळी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, भाजपा नेते लालकृष्ण आडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबरच्या युतीच्या आठवणींनाही उजाळा दिला. शिवसेना-भाजपा युती कालपरवाची नाही तर 25 वर्षांची होती असे ते म्हणाले. वाजपेयी यांच्याबरोबरच्या भेटीचा एक किस्साही त्यांनी सांगितला. 1990 मध्ये विदर्भाच्या दौऱयावरून विमानाने परत येताना पुढच्या खुर्चीवर वाजपेयी बसले होते. हवाईसुंदरीकरवी त्यांना निरोप पाठवला. काही वेळानंतर वाजपेयी स्वतŠ मागे आले आणि त्यांनी नमस्कार करत शिवसेनाप्रमुखांची, युतीची विचारपूस केली होती. त्यावेळी मी त्यांना गमतीने म्हणालो होतो, ‘युती जमींपे नहीं, आसमानमें भी चल रही है!’ ‘सरकार येईल आणि जाईल पण देश टिकला पाहिजे’ असे ते म्हणायचे. ही युती सत्ता मिळविण्यासाठी झाली नव्हती तर आमच्या कुटुंबांचे ऋणानुबंध निर्माण झाले होते. माझे सरकार पाहिजे म्हणून लढत नाही तर माझा देश टिकला पाहिजे म्हणून लढतोय असा विचार करणारे किती राजकारणी आहेत असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.
यावेळी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, मनोहर जोशी, ऍड. लीलाधर डाके, सुधीर जोशी, खासदार संजय राऊत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री दिवाकर रावते, पर्यावरणमंत्री रामदास कदम, खासदार आनंदाराव अडसूळ, चंद्रकांत खैरे, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, सौ. रश्मी ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार विनायक राऊत आदी उपस्थित होते. मेळाव्याचे सूत्रसंचालन शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांनी केले.
जो न देते थे जबाब, अब उनके सलाम आने लगे
मुख्यमंत्री दिल्लीत जाऊन सांगत आहेत, काहीही झालं तर शिवसेना आपल्यासोबत हवी. याला म्हणतात चमत्कार. ‘जो न देते थे जबाब, अब उनके सलाम आने लगे; वक्त बदला तो मेरे नीम पर भी आम आने लगे.’ याला म्हणतात गोडबोलेपणा. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला सांगितलंय, ‘माणूस तोंडाने कडवा असावा, पण गोडबोला भडवा नसावा.’ आम्ही कडवे आहोत, या भडव्यांचं राज्य घालविल्याशिवाय राहणार नाही.
पाच राज्यांमध्ये जिंकायला पंतप्रधान ठाण मांडत असतील तर तो भाजपाचा पराभवच!
पाच राज्यांमधील आगामी निवडणुकांसाठी भाजपाने इतर सर्व प्रश्नांकडे केलेल्या दुर्लक्षाचा समाचारही उद्धव ठाकरे यांनी यावेळी घेतला. देशातले सर्व प्रश्न बाजूला ठेवून देशाचे प्रधान सेवक आणि त्यांचे मंत्री या पाच राज्यांमध्ये आता बोंबलत फिरणार. त्यापेक्षा दुष्काळग्रस्त भागांमध्ये जा आणि त्यांना द्या काय तरी मदत असे उद्धव ठाकरे म्हणाले. पाच राज्यांमध्ये जिंकायला पंतप्रधानांना ठाण मांडावे लागत असेल तर तो भाजपाचा मोठा पराभव आहे अशी टीका त्यांनी केली. निवडणुका जिंकायला इतकी खलबतं केली जातात मग महागाई कमी करायला का होत नाहीत असे ते म्हणाले.
यांना निवडणुका जिंकायच्यात. सध्या हाऊसिंग सोसायटीची निवडणूक असली तरी मुख्यमंत्री फोन करतात. त्यांच्या हातात भाजपचा झेंडा देतात. पण झेंडय़ाला दांडासुद्धा असतो हे लक्षात ठेवा. उद्या झेंडा उडून जाईल आणि हातात राहिलेला दांडा लोक तुमच्या डोक्यात मारल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला.
कर्नाटकसारखी धमक महाराष्ट्र का दाखवत नाही?
पाणी नाही, चारा नाही अशी परिस्थिती समोर दिसताच तातडीने दुष्काळ जाहीर करणाऱया कर्नाटक सरकारची उद्धव ठाकरे यांनी यावेळी प्रशंसा केली. महाराष्ट्रातही दुष्काळाचा महाराक्षस उभा आहे. ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय. लोक जिवानिशी जात आहेत, स्थलांतर करत आहेत. मग केंद्रात आणि राज्यात सरकार असतानाही आपले मुख्यमंत्री दुष्काळ जाहीर करण्याची धमक का दाखवत नाहीत, असा खणखणीत सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करून दुष्काळी भागात चारा-पाण्याची व्यवस्था तातडीने न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा उद्धव ठाकरे यांनी सरकारला यावेळी दिला.
…तर तुमचं सिंहासन भस्मसात होईल!
आता जे प्रश्न इथे विचारतोय तेच अयोध्येत जाऊन मोदींना विचारणार आहे असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, एकदा आठवण करून द्यायला येतोय. नंतर तुम्ही काहीच केले नाही तर देशभरातील तमाम हिंदू अयोध्येच्या दिशेने जातील हे लक्षात ठेवा. तुमचा पराभव व्हावा आणि आम्ही बसावे अशी आमची इच्छा नाही, पण देशातील तमाम हिंदू आशेवर आहेत आणि त्या आशेवर पाणी टाकू नका. नाहीतर या पाण्याचा लाव्हा बनेल आणि तुमचं सिंहासन भस्मसात होईल हे विसरू नका, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपला दिला.
राफेल खरेदीतील भ्रष्टाचाराचे भूत भाजपच्या मानगुटीवर बसेल – देसाई
हिंदुस्थानात बोफोर्स तोफा खरेदीतील भ्रष्टाचार 20-25 वर्षे गाजला. आता राफेल विमान खरेदीतील भाजपचा भ्रष्टाचार दीर्घकाळ गाजेल. कारण 526 कोटी रुपयांच्या एका विमानाची खरेदीची किंमत 1570 कोटी रुपयांवर गेली. शस्त्रास्त्र खरेदीत अनुभवशून्य असलेल्या अनिल अंबानी यांच्या रिलायन्स एअरोस्पेस कंपनीला विमान खरेदीच्या व्यवहारात भागीदार केले. राफेल खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराचे भूत भाजप सरकारच्या मानगुटीवर बसेल, असा इशारा शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी आज शिवसेनेच्या विराट दसरा मेळाव्यात दिला. शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी भाजप सरकारवर तोफ डागली. महागाई, नोटाबंदी, इंधन दरवाढ, बोफोर्स, राफेल विमान खरेदी अशा विषयांवर भाजप सरकारला धारेवर धरले. हिंदुस्थानने उपग्रह तयार केले. ‘नाग’, ‘त्रिशूळ’, ‘अग्नी’सारखी क्षेपणास्त्र तयार केली आहेत. राफेलच्या तोडीचे विमान करण्याची क्षमता हिंदुस्थानमधील कंपन्यांमध्ये आहे. हिंदुस्थान एअरोनॉटिक्स कंपनीला डावलून अनिल अंबानी यांच्या कंपनीला निवडण्याचे कोणते कौशल्य भाजप सरकारने दाखवले, असा प्रश्न देसाई यांनी केला. याचे उत्तर भाजप सरकारला देशातील जनतेला द्यावे लागेल, असेही देसाई म्हणाले.
2019 साली शिवसेनेचा मुख्यमंत्री शिवतीर्थावर शपथ घेईल! – संजय राऊत
शिवतीर्थावर विराट, अतिविराटच नव्हे तर क्रांतिकारी गर्दी उसळली आहे. या गर्दीच्या ज्या लाटा उसळल्या आहेत त्या लाटा म्हणजे कसली भेसळ नव्हे तर ते स्वबळ आहे. 2019 साली शिवसेनेचा मुख्यमंत्री शिवतीर्थावर शपथ घेईल, असे हे क्रांतिकारी स्वबळ आहे, असा ठाम विश्वास शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत, 2019 साली मीच मुख्यमंत्री असणार आहे. पण तेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तर शिवसेनेचा असणार आहे. तुम्ही कुठल्या राज्याचे मुख्यमंत्री होणार आहात? निवडणुका घेणार आहात ना? असा सवाल त्यांनी केला.
भाजपला गाडल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही – रामदास कदम
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर शिवसेनेला साथ देतील असे वाटत होते. पण मोदी शिवसेनेला संपवायला निघाले होते. पण आता शिवसेनेची साथ भाजपला हवी आहे, मात्र आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका भाजपच्या सोबतीने लढवायची नाही, भाजपला गाडल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही, असा निर्धार आज शिवसेना नेते रामदास कदम यांनी व्यक्त केला.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात रामदास कदम यांनी भाजपच्या दुटप्पी धोरणावर टीका केली. शिवसेनेचे बोट पकडून भाजपने महाराष्ट्रात प्रवेश केला. 30 वर्षांची युती तोडून भाजपने बेइमानी केली. आता निवडणुका आल्यावर भाजपला शिवसेनेची आठवण झाली, पण आता भाजपसोबत जायचे नाही. निवडणुकांमध्ये भाजपला गाडायचे. स्वतŠच्या ताकदीवर शिवसेना निवडणुका लढवेल. स्वत:च्या ताकदीवर विधानसभेवर भगवा फडकवल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही, असेही कदम म्हणाले.
चला उठा, भगवा फडकवूया – महापौर
शिवसेनाप्रमुखांनी हिंदूंना हिंमत दिली. त्या हिमतीच्या जोरावर अन्यायाविरुद्ध लढतोय. कामगार, शेतकरी, महिला यांच्यावर होणाऱया अन्यायाविरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिक आवाज उठवतोय. ज्या जनतेने शिवसेनेवर विश्वास दाखवला तो सार्थ ठरवून आपण विविध प्रश्न सोडवत आहोत. मग मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न असो, कचऱयाचा प्रश्न असो की रस्त्यांचा प्रश्न… प्रत्येक प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना झटत आहे. प्लॅस्टिकबंदीसारख्या महत्त्वाच्या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करून पर्यावरणाबरोबर लोकांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जात आहे. जनतेच्या हितासाठी सतत कार्यरत असलेल्या शिवसेनेचा भगवा आपल्याला लोकसभा, विधानसभेवर फडकवायचा आहे. तेव्हा दुष्ट प्रवृत्तीच्या रावणाचा धनुष्यबाणाने वेध घेऊया. चला उठा… संसदेवर, विधानसभेवर भगवा फडकवूया, असे आवाहन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले.


























































