
सामना ऑनालाईन । नवी दिल्ली
माजी परराष्ट्रमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप करणाऱ्या पत्रकार प्रिया रमाणी यांच्या विरोधात अकबर यांनी दाखल केलेला मानहानीचा खटला गुरुवारी दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टाने दाखल करून घेतला. आता त्यावरील पुढची सुनावणी 31 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यावेळी अकबर प्रत्यक्ष कोर्टात उपस्थित राहून आपला जबाब नोंदवतील.
अकबर यांच्या वतीने वरिष्ठ वकील गीता लुथरा या खटला लढवत आहेत. अकबर हे एक प्रतिष्ठत व्यक्ती आहेत. प्रिया रमाणी यांच्या आरोपांमुळे त्यांच्या प्रतिष्ठेचे मोठे नुकसान झाले आहे. ही प्रतिष्ठा कमवायला अकबर यांना 40 वर्षांपेक्षा अधिक काळ लागला आहे. प्रिया रमाणी यांनी अकबर यांच्या विरोधात बदनामी करणारे अनेक ट्विट केले आहेत. त्यांनी केलेले दुसरे ट्विट अपमानजनक आहे. याला 1200 लोकांनी लाइकही केले आहे असे ऍड. गीता लुथरा यांनी सांगितले.
मानहानीचा खटला मागे घ्या : एडिटर्स गिल्ड
माजी केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांनी महिला पत्रकार प्रिया रमाणींविरोधातील मानहानीचा खटला मागे घ्यावा असे निर्देश एडिटर्स गिल्ड इंडियाने अकबर यांना दिले आहेत. अकबर यांनी हे निर्देश न पाळल्यास रमाणींसह अकबर यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप करणाऱ्या सर्व महिला पत्रकारांना एडिटर्स गिल्ड सर्वतोपरी सहकार्य करील असा इशाराही देण्यात आला आहे.
सर्वत्र महिलांचा मान राखला गेला पाहिजे! केंद्रीय मंत्री जावडेकर यांचे मत
‘मी टू’ मोहिमेची व्याप्ती देशभरातील विविध क्षेत्रांत वाढत आहे. त्याबाबत आपले मत व्यक्त करताना केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी कामाच्या ठिकाणीच नव्हे तर सर्वच ठिकाणी महिलांचा सन्मान राखला गेला पाहिजे. महिलांना पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करता यावे यासाठी स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार आम्ही आधीच केला आहे. महिलांचा मानभंग करणारे कोणतेही कृत्य खपवून घेतले जाऊ नये हे आमचे स्पष्ट मत आहे, असेही केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी स्पष्ट केले.























































