बायोगॅस योजनेत भ्रष्टाचार : कारवाईसाठी उपोषण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी

देवगड तालुक्यात राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रमात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करत सन २०१७-१८ मध्ये मंजूर झालेल्या देवगड तालुक्यातील ७४ लाभार्थ्यांनी बायोगॅस बांधलेला नसतानाही त्यांना बायोगॅसचे अनुदान देण्यात आले आहे. हा एक प्रकारचा भ्रष्टाचार असून याला जबाबदार असणाऱ्या ग्रामसेवक, कृषी विस्तार अधिकारी, कृषी अधिकारी आणि गट विकास अधिकारी यांच्यावर योग्यती कारवाई करावी या मागणीसाठी महेश जुवाटकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हा परिषदसमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.

देवगड पंचायत समिती मार्फत देवगड तालुक्यात सन २०१७-१८ मध्ये राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम ही योजना राबविलि होती. या योजनेच्या उद्दिष्टानुसार ७४ लाभार्थ्यांना बायोगॅसचा लाभ देण्यात आला आहे. या लाभार्थ्याना आपण प्रत्यक्ष भेट दिली असता त्यांच्याकडे बायोगॅस नसल्याचे आढळून आले. मात्र त्यांना बायोगॅस बांधण्यासाठी देण्यात येणारे अनुदान देण्यात आले असल्याचे स्पष्ट होताच आपण संबंधित ग्रामसेवकांशी संपर्क साधला असता उद्दिष्ट पूर्ती करण्यासाठी बायोगॅस बांधलेला नसतानाही फोटो सहित दाखले दिले गेले असल्याचे ग्रामसेवकांकडून सांगण्यात आले असल्याचे महेश जुवाटकर यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या सर्व बाबी लक्षात घेता कृषी अधिकाऱ्यांनी चुकीचा अहवाल दिला असल्याचे निदर्शनास येताच आपण देवगड गट विकास अधिकारी यांचे याकडे लक्ष वेधले. यावर त्यांनीही उद्दिष्ट पुरतीसाठी जिल्हा परिषदकडून दबाव आणून चुकीचा अहवाल सादर करण्यास भाग पाडले जात असल्याचे त्यांनी सांगितले असल्याचे जुवाटकर यांनी स्पष्ट केले. तसेच या बायोगॅस विकास कार्यक्रमात देवगड तालुक्यात बायोगॅस न बांधताच पैसे देण्यात आल्याने यात भ्रष्टाचार झाला असून त्याला ग्रामसेवक, कृषी विस्तार अधिकारी, कृषी अधिकारी आणि गट विकास अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी महेश जुवाटकर यांनी रामचंद्र भाबल, विजय येडगे, प्रिती परब, सोनल गावकर, वैदेही जुवाटकर यांच्यासह जिप समोर आमरण उपोषण सुरु केले आहे. याबाबतचे निवेदन जिप मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करण्यात आले आहे