नगर शहरात पाणीपुरवठा व भुयारी गटार योजना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

अमृत अभियानांतर्गत महापालिकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या शहर पाणीपुरवठा योजना (फेज 3) व भुयारी गटार व मलनिस्सारण प्रकल्प योजनेमुळे शहराचा ड्रेनेज व पाणी पुरवठ्याचा आगामी 40 वर्षांचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. 107 कोटींची पाणी योजना आणि भुयारी गटार योजना या दोन्ही योजना शहराच्या विकासाला दिशादर्शक ठरणार आहेत. महापौरपदाच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेले दोन मोठे प्रकल्प माझ्या कार्यकाळात मार्गी लागल्याचा मनस्वी आनंद होत असल्याचे महापौर सुरेखा कदम यांनी म्हटले आहे. रविवारी (दि.21) शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे नगर शहराच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या हस्ते या दोन्ही प्रकल्पांच्या कामांचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचेही महापौर कदम यांनी सांगितले.

महापौर कदम म्हणाल्या की, महापालिका स्थापन झाल्यापासून शिवसेनेने शहरात विकासकामांनाच प्राधान्य दिले आहे. शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली दोन ते सव्वादोन वर्षांपासून महापालिकेचा कारभार पाहतांना अनेक रखडलेली कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. शहराच्या आगामी 40 ते 50 वर्षांच्या दृष्टीने महत्वाकांक्षी असलेल्या पाणी योजना व भुयारी गटार योजना अनेक अडथळे पार करुन मार्गी लागल्या आहेत. विकासकामांच्या थापा मारणाऱ्या आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर या दोन्ही योजना मीच मंजूर करुन आणल्याच्या दावा करणाऱ्या थापेबाज लोकप्रतिनिधींनी केंद्राच्या व राज्याच्या सत्तेत असल्याचा गैरफायदा घेत या योजना मार्गी लागू नयेत, यासाठी वारंवार खोडा घालण्याचा प्रयत्न केला. ठेकेदाराची तळी उचलणाऱ्या या नेत्याने स्वतःच्या स्वार्थापोटी तक्रारी करुन आणि ठेकेदाराशी मोठी ‘डील’ करुन 33 टक्के वाढीव दराची निविदा मंजूर करावी, यासाठी शासनाकडे हट्ट धरला होता. त्यामुळे महापालिकेवर कोट्यवधींचा अतिरिक्त बोजा पडणार होता. शिवसेनेने या लोकप्रतिनिधीचा डाव हाणून पाडत ही योजना मंजूर करुन आणली. यातही आडकाठी आणण्याचा प्रयत्न करण्यात आल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर शासनाच्या राज्यस्तरीय समितीने या योजनेच्या निविदेला अंतिम मंजुरी दिली.

आज या दोन्ही योजनांच्या कामांचे सर्वेक्षण होऊन नियोजित वेळेत योजना मार्गी लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही योजनांच्या माध्यमातून शहराचा पाणी व मलनिस्सारण प्रकल्पाचा प्रश्‍न कायमचा मार्गी लागणार आहे.

पाणी योजना व भुयारी गटार योजनेत समाविष्ट असलेल्या कामांची माहितीही महापौर कदम यांनी दिली. पाणी योजनेत प्रोच चॅनल, अस्तित्वात असलेल्या जुन्या जॅकवेलची दुरुस्ती, जॅकवेल पासून बीपीटीपर्यंत अशुध्द पाणी घेवून जाणारी 587 मीटरची जलवाहिनी, बीपीटीपासून ते विळद जलशुध्दीकरण केंद्रापर्यंतची 14 किलोमीटरची मुख्य जलवाहिनी, अस्तित्वात असलेल्या बीपीटीची दुरुस्ती, 45 एमएलडी क्षमतेचे नवीन जलशुध्दीकरण केंद्र, अस्तित्वात असलेल्या अनुक्रमे 16, 22 व 35 एमएलडी जलशुध्दीकरण केंद्रांची दुरुस्ती, विळद ते वसंतटेकडीपर्यंत शुध्द पाणी वाहून नेणारी 17.50 किलोमीटरची मुख्य जलवाहिनी, वसंत टेकडी येथे नवीन जमिनीवर पाण्याची टाकी बांधणे, सध्या अस्तित्वात असलेल्या टाकीची दुरुस्ती करणे आदी विविध कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.

भुयारी गटार व मलनिस्सारण प्रकल्प योजनेमध्ये सोलापूर रोडवरील जुन्या मलनिस्सारण प्रकल्पाशेजारी नवीन 57 एमएलडी क्षमतेचा मलनिस्साण प्रकल्प उभारणे, 146 किलोमीटर लांबीच्या भूमिगत गटारी करणे, शहरातील मलवाहिन्या प्रकल्पाला जोडण्यासाठी 14 किलोमीटर लांबीची मुख्य वाहिनी करणे, केडगावसह तीन ठिकाणी पंपींग स्टेशन व मशिनरी उभारणे यासह ही कामे करत असतांना अस्तित्वात असलेल्या जलवाहिन्यांची तुट-फूट होण्याची शक्यता असल्याने त्या दुरुस्तीसाठी, स्थलांतरीत करण्यासाठीही योजनेत तरतूद करण्यात आली आहे.

पाणी योजना व मलनिस्सारण योजना या दोन्ही प्रकल्पांची डीपीआर वस्तुस्थितीचा संपूर्ण आढावा घेवून व अभ्यासपूर्वक तयार करण्यात आले असल्याने नियोजनबध्द व दर्जेदार कामे होतील व शहराचा प्रश्‍न मार्गी लागेल, असा विश्‍वासही महापौर कदम यांनी व्यक्त केला आहे. रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या शुभहस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या शुभारंभाच्या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन महापौर कदम व शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी केले आहे.