
सामना ऑनलाईन । अमृतसर
अमृतसर येथील भयंकर दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी दिले आहेत. अपघातानंतर 16 तासांनी मुख्यमंत्री घटनास्थळी पोहचले, मात्र संतप्त जमावाच्या रोषामुळे त्यांना अवघ्या दोन मिनिटांत काढता पाय घ्यावा लागला. दरम्यान, या अपघाताची जबाबदारी रेल्वे, पोलीस प्रशासन आणि दसरा आयोजन समितीने स्वीकारली नाही.
अमृतसर येथील जोडा फाटक परिसरात रेल्वे रुळांनजीकच्या मोकळ्या जागेत काल शुक्रवारी रावणदहनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मोठी गर्दी उसळली होती. शेकडो लोक रेल्वे रुळांवर उभे होते. रावणदहनाला सुरुवात होताच फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. आणखी लोक धावत रेल्वे रुळांकडे येऊ लागले. तेवढय़ात भरधाव वेगाने आलेल्या जालंदर-अमृतसर रेल्वेने अनेकांना चिरडले. त्यात 61 जण ठार आणि 72 जण जखमी झाले.
ड्रायव्हरने ब्रेक लावला असता तर याहून मोठा अपघात झाला असता
नियमाप्रमाणे ताशी 90 कि.मी. वेगाने रेल्वे धावत होती. ड्रायव्हरने इमर्जन्सी ब्रेक लावला असता तर यापेक्षा मोठा अपघात झाला असता असे रेल्वे बोर्डाचे चेअरमन अश्विनी लोहानी यांनी सांगितले. रावणदहनाचा कार्यक्रम रेल्वे रुळांजवळ होता, पण ती जागा रेल्वेची नाही. अपघाताला रेल्वे जबाबदार नाही असे ते म्हणाले.
रेल्वे राज्यमंत्री म्हणाले, आमची चूक नाहीच!
घटनास्थळी पोहचलेले रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी या दुर्घटनेत रेल्वेची चूक नाही तर चौकशी कशाची करायची, असा सवाल केला. रेल्वे ड्रायव्हर आणि गेटमनला निलंबित करणार नाही. ज्या ठिकाणी दुर्घटना घडली तेथून रेल्वे फाटक 300 मीटरवर आहे. रावणदहनाचा कार्यक्रम रेल्वे रुळांपासून 70 मीटरवर होता. त्यामुळे गर्दीची कल्पना येणे शक्य नाही. दुर्घटनेला रेल्वे जबाबदार नाही. लोक रेल्वे रुळांवर आले. कायदा-सुव्यवस्था राखणे राज्य सरकारची जबाबदारी आहे, असे सिन्हा यांनी सांगितले.
16 तासांनी मुख्यमंत्री आले; 2 मिनिटांत माघारी फिरले
अपघातानंतर तब्बल 16 तासांनी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग अमृतसरमध्ये आले. मी इस्रायलला जाण्यासाठी विमानतळावर गेलो होतो. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर दौरा रद्द करून येथे परतलो असे उशिरा येण्यामागचे कारण मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची चौकशी केली. रुग्णालयाबाहेर जखमींच्या नातेवाईकांनी जोरदार निदर्शने केली. घटनास्थळी ते पोहचले पण संतप्त जमावाने घोषणाबाजी सुरू करताच रेल्वे रुळांपर्यंत न जाता अवघ्या 2 मिनिटांत त्यांना परतावे लागले. दरम्यान, या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
रेल्वेने हॉर्न न दिल्यानेच अपघात – सिद्धू
अपघातानंतर आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. रेल्वेचा वेग प्रचंड होता. काही सेकंदांत अपघात झाला. रेल्वेने हॉर्न न दिल्यानेच अपघात झाला आहे असा आरोप पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी केला आहे. दुर्घटनेनंतर सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर घटनास्थळावरून घरी निघून गेल्याने टीका होत आहे. याचे खंडण करून सिद्धू म्हणाले, माझी पत्नी हॉस्पिटलमध्ये होती. तिने रुग्णांसाठी धाव घेऊन मदत केली आहे.
हिरवा सिग्नल मिळाला म्हणून गाडी पुढे नेली
पोलिसांनी रेल्वे ड्रायव्हरला ताब्यात घेतले आहे. मला ऑल क्लिअर हिरवा सिग्नल मिळाला होता म्हणून रेल्वे पुढे नेली असे ड्रायव्हरने पोलिसांना सांगितले.
संयोजक म्हणाले, पोलिसांनी ‘एनओसी’ दिली
रावणदहन कार्यक्रमासाठी पोलिसांनी परवानगी दिली होती असा दावा करीत दसरा संयोजन समितीने पोलिसांनी दिलेली एनओसी पत्रकारांना दाखविली.
रेल्वे क्रॉसिंग येथे तोडफोड, केबिनमॅनला मारहाण
संतप्त जमावाने शुक्रवारी रात्री क्रॉसिंग येथे तोडफोड केली आणि केबिनमॅनलाही मारहाण करण्यात आली.























































