
सामना ऑनलाईन। कोपेनहेगेन
सहा वर्षांनंतर डेन्मार्क ओपनच्या अंतिम फेरीत मजल मारणाऱ्या हिंदुस्थानच्या सायना नेहवालला फायनलमध्ये चिनी तायपेईच्या ताई झू यिंगकडून १३-२१ ,२१-१३ ,६-२१ असा पराभव पत्करावा लागला. जागतिक अग्रमानांकित यिंगचा हा सायनावरील सलग ११ वा विजय आहे. सायनाने यापूर्वी २१ मे २०१२ ला आपले पहिले आणि एकमेव डेन्मार्क ओपन विजेतेपद पटकावले होते. यंदा त्याचीच पुनरावृत्ती तिच्याकडून होईल असे वाटत असताना यिंगने पुन्हा सायनाचे स्वप्न उधळले.
जागतिक अग्रमानांकित ताई झू यिंगने महिला एकेरीच्या अंतिम लढतीत पहिल्या गेमपासूनच आपले वर्चस्व कायम ठेवले होते. यिंगने पहिला गेम १५ मिनिटात २१-१३ असा जिंकत सायनावर दडपण वाढवले. दुसऱ्या गेममधे सायनाने आपल्या बहारदार खेळणे यिंगला जोरदार झुंज देत पुनरागमन साजरे केले आणि हा गेम २१-१३ असा जिंकत लढतीत चुरस आणली. पण तिसऱ्या गेममधे मात्र सायना पुनः मागे पडली .या गेमच्या मध्यंतरालाच ताईने ११-२ अशी मोठी आघाडी घेतली. या पिछाडीनंतर सायना स्वतःला सावरू शकली आहि आणि यिंगने पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध करीत २१-६ अशा सहज विजयासह डेन्मार्क ओपनचे विजेतेपद पटकावले.
सायनावर यिंगचा वरचष्मा
आतापर्यंत ताई झू यिंग आणि सायना नेहवाल यांच्या लढतीत यिंगने नेहमी बाजी मारली आहे. नुकत्याच जकार्ता येथील आशियाई खेळांमध्येही यिंगने सायनाला पराभूत केलं होतं. २०१३ साली झालेल्या स्विस ओपन स्पर्धेत सायनाने यिंगला पराभवाचं पाणी पाजलं होतं. त्यानंतर सलग ११ लढतींत सायना नेहवाल यिंगविरोधात एकदाही जिंकू शकलेली नाही.

























































