अभिजीत यादव याच्या हत्येचे गूढ वाढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। लखनौ

उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सभापती रमेश यादव यांचा धाकटा मुलगा अभिजीत यादव याच्या हत्येचे गूढ अधिकच वाढले आहे. अभिजीतची आई मीरा यादव यांनी न्यायालयात आपण अभिजीतची हत्या केली नसून त्याने आत्महत्या केली आहे असा दावा करत जबाब फिरवल्याने या खटल्याची दिशाच बदलली आहे.

सोमवारी सकाळी पोलिसांनी मीरा यादव यांची ९ तास कसून चौकशी केली होती. त्यावेळी अभिजीतची हत्या मीच केली अशी कबुली मीरा यांनी दिली होती. अभिजीत मद्यधुंद अवस्थेत होता. त्याने माझ्याशी गैरवर्तन करत मला मारण्याचा प्रयत्न केला. यामुळे मी त्याला मारलं. नंतर ओढणीने त्याचा गळा आवळून हत्या केली. असा कबुली जबाब मीरा यांनी पोलिसांना दिला होता. पण न्यायालयात मात्र त्यांनी घूमजाव करत अभिजीतने आत्महत्या केल्याचा दावा केला. त्यांच्या जबाब सतत बदलत असल्याने पोलिसही चक्रावले आहेत.

रमेश यादव यांचा मोठा मुलगा अभिषेक यादव याने तक्रार केल्यानंतर मीरा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या चौकशीत मीरा यांनी अभिजीतची हत्या केल्याची कबुली दिली. अभिषेकने आईविरोधात भादंवि कलम ३०२ अंतर्गत न्यायालयात खटला दाखला केला आहे.

मीरा या रमेश यादव यांची दुसरी पत्नी आहे. त्यांची पहिली पत्नी उत्तर प्रदेशमधील एटा येथे कुटुंबीयांसोबत राहते. ज्या फ्लॅटमध्ये अभिजीतची हत्या झाली तो रमेश यांचा असून तेथे रमेश , मीरा ,अभिजीत व अभिषेक यादव राहत होते. २१ ऑक्टोबरला अभिजीतचा मृतदेह दारुल शफा येथे सापडला होता. सुरुवातीला अभिजीतचा मृत्यू नैसर्गिक मृत्यू झाल्याचे यादव कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले होते. पण पोस्टमार्टम मध्ये अभिजीतची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे समोर आले.