
सामना प्रतिनिधी । संग्रामपूर
तालुक्यातील पळशी झांशी येथील भूमिहीन शेतकर्याच्या पदवीधर मुलाने आज पळशी झाशी शेतशिवारात निंबाच्या झाडाला दोर बांधून फास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. घटनेमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ माजली असून मृत सागर दिनकर वाघ (२४) याने मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतील मजकुराप्रमाणे गावकर्यांनी त्याचे प्रेत येथील तहसीलदार कार्यालयात आणून ठेवले आहे.
पंतप्रधान योजनेंतर्गत मंजूर झालेले घरकुलाचा लाभ तत्काळ देण्यात यावा. तसेच व्यवसायासाठी मुद्रा योजनेंतर्गत कर्ज मिळावे ही सागर दिनकर वाघ (२४) याची मागणी होती. त्यासाठी पंचायत समिती आणि स्टेट बँक शाखेच्या शाखा व्यवस्थापकाकडे वेळोवेळी मागणी केली होती. परंतु एकही मागणी मंजूर न झाल्याने उच्च शिक्षित सागरने कंटाळून शेवटी सोमवारी गाव शिवारातील निंबाच्या झाडाला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.
सागर याने आपल्या आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले की, शाखा व्यवस्थापक यांनी कर्ज देताना अपमानकारक वर्तन केले आहे. त्याचे वडील इस्त्री करण्याचा व्यवसाय करीत असून आई-वडील, एक भाऊ असा त्याचा परिवार आहे. परिवारातील एकालाही शासकीय नोकरी नाही तसेच शेतीवाडी सुद्धा नाही. त्यामुळे व्यवसायासाठी पंतप्रधानाच्या मुद्रा योजनेंतर्गत कर्ज घेऊन व्यवसाय वाढविता येईल परंतु त्याचे स्वप्न पुर्ण होण्याअगोदरच त्याला आत्महत्या करावी लागली. एका उच्चशिक्षित (एम.कॉम.) युवकाने सरकारच्या ध्येयधोरणाला कंटाळून केलेल्या आत्महत्येमुळे तालुक्यात शोककळा पसरली आहे.
शासनाने मृतकाच्या कुटूंबाला पाच लाख रुपये रोख द्यावे आणि संग्रामपूर स्टेट बँक शाखेचे व्यवस्थापक तांदळे यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सागरच्या कुटूंबीयांसह गावकर्यांनी केली आहे. सागरचा मृतदेह तहसील कार्यालयात आणला गेला. त्यावेळी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त देण्यात तैनात होता. उपविभागीय पोलीस अधिकारी तथा उपविभागीय महसुल अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते.
































































