
सामना प्रतिनिधी । जिंतूर
महावितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्याला मोबाईल फोनवरुन शिवीगाळ केल्या प्रकरणी जिंतूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
जिंतूर येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता नागेश लोणे यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास राहुल गाडेकर याने त्यांच्या मोबाईलवर फोन केला. त्यानंतर गाडेकर यांनी हाच मोबाईल फोन कॉन्फ्रन्स कॉलच्या सहाय्याने आमदार विजय भांबळे यांना जोडून दिला. त्यावेळी आमदार विजय भांबळे यांनी तालुक्यातील मानमोडी येथील वीज पुरवठा सुरू करण्याचे सांगत याच कारणावरुन फोनवरुन आपल्याला शिवीगाळ केली. आताच्या आता मानमोडी या गावाचा वीजपुरवठा सुरू करा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच फोनवरुन जिवे मारण्याची धमकीही दिली. नागेश लोणे यांच्या या फिर्यादीवरुन जिंतूर पोलीस ठाण्यात 22 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक एस.एस. आमले या प्रकरणाचा तपास करीत आहेत.






















































