
सामना प्रतिनिधी । मुंबई
पुरेशी आसने नसतानाही विद्यार्थ्यांना गाडीत कोंबून त्यांची शाळेत ने-आण करणाऱया बेकायदा स्कूल बसविरोधात राज्य सरकारने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. 1 ते 15 ऑक्टोबरदरम्यान शासनाने 316 बेकायदा स्कूल बसवर कारवाई केली असून त्यांच्याकडून 1 लाख 96 हजार 602 रुपये इतका दंड वसूल केला आहे, अशी माहिती राज्य सरकारने आज हायकोर्टात दिली.
राज्यातील विद्यार्थ्यांची स्कूल बसमधून बेकायदा वाहतूक करण्यात येत असून या वाहतुकीमुळे अनेक अपघातदेखील घडले आहेत. याप्रकरणी ‘पीटीए युनायटेड फोरम’ या संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी राज्य सरकारची बाजू मांडणारे ऍड. मनीष पाबळे यांनी सांगितले की, बेकायदा स्कूल बसविरोधात कारवाई सुरूच असून सरकारने 15 दिवसांत 933 वाहनांची तपासणी केली. यात 316 वाहने बेकायदा असल्याचे आढळले. त्यामुळे अशा वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून दंडही वसूल करण्यात आला आहे.





























































