
सामनी प्रतिनिधी । मुंबई
चालू वर्षी सुरुवातीला पडलेल्या पावसावर विश्वास ठेवून लाखो शेतकर्यांनी पेरण्या केल्या मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरविली यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून खरीप तर गेलेच पण आता रब्बीच्या ही पेरण्या झाल्या नाहीत. सरकारने दुष्कासदृष्य नव्हे तर दुष्काळच जाहीर करून शेतकर्यांना हेक्टरी पन्नास हजाराची तातडीने मदत द्यावी अशी मागणी आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी केली आहे.
चालू वर्षात निसर्गाने अवकृपा केली. तुरळक पडलेल्या पावसावर लाखो शेतकर्यांनी पेरण्या केल्या, मात्र नंतर पावसाअभावी ही पिके जळून खाक झाली. या दुष्काळाची इतकी भीषण तीव्रता वाढली की आज पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊन बसला आहे. जनावरांना चारा नाही. संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत आहे. राज्यात दुष्काळसदृष्य नाही, तर दुष्काळच जाहीर करावा. केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारने दुष्काळ म्हणून ज्या ज्या आवश्यक उपाय योजना असतात त्या त्या तातडीने लागू कराव्यात व आमलात आणाव्यात. शेतकर्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये तातडीची मदत जाहीर करून दिलासा द्यावा. सरकारच्या वेळकाढू पणामुळे शेतकर्यांमध्ये प्रचंड संताप आणि नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. जणावरांना तात्काळ छावण्या, पाण्याचे टँकर कोणत्याही मुहूर्ताची वाट न पाहता चालू कराव्यात. दुष्काळसदृष्य नव्हे तर दुष्काळच जाहीर केल्यास शेतकर्यांना आणि जनतेला दिलासा मिळेल अशी मागणी, क्षीरसागर यांनी केली आहे.





























































