मुंबईत उद्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद, उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील पायाभूत सुविधांच्या गरजा या दिवसागणिक वाढत आहेत. त्यामुळे या शहरात रस्ते, पाणीपुरवठा, पाण्याचा निचरा, वाहतूककोंडी अशा नव्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्यांच्या मुळाशी जाऊन त्या सोडविण्यासाठी शिवसेनेच्या पुढाकाराने शनिवार, 27 ऑक्टोबर रोजी ‘मुंबई इन्फ्रास्ट्रक्चर ग्लोबल सोल्युशन्स समिट’ आयोजित करण्यात आले आहे. परळच्या ‘आयटीसी’ हॉटेलमध्ये होणाऱया या परिषदेत मुंबईतील सर्व यंत्रणांना एकत्र आणून शहराच्या विकासासाठी नेमक्या काय उपाययोजना करायला हव्यात याचा ऊहापोह केला जाणार आहे. परिषदेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, तर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हेदेखील यावेळी मुंबईतील समस्यांविषयी आपली भूमिका मांडतील.

दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी आयोजित केलेल्या या परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या होणार असून यावेळी एकूण 10 परिसंवाद होतील. रस्तेनिर्मितीतील नवे तंत्रज्ञान, कोस्टल रोड, सांडपाण्याच्या समस्या, शहरी दळणवळण, घनकचरा व्यवस्थापन, मुंबई मेट्रोच्या बांधकामासाठीचे नवे पर्याय इत्यादी विषयांवर तज्ञ मंडळी आपले विचार मांडतील. मुंबईतील रस्त्यांच्या समस्यांवर बोलण्यासाठी आंतरराष्ट्रीय तज्ञ डॉ. डार्विन डेलग्रेन हे या परिषदेला उपस्थित राहतील. मुंबई आयआयटीचे प्राध्यापक के. व्ही. राव, डॉ. एस. एल. धिंग्रा, बॉर्डर रोडस् ऑर्गनायझेशचे डॉ. एस. एस. पोरवाल हे आंतरराष्ट्रीय तज्ञ परिषदेत भूमिका मांडतील.

मुंबईचे रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूककोंडी, ड्रेनेज या सर्व समस्या सोडविण्यासाठी सर्व यंत्रणांनी नेमक्या काय उपाययोजना करायला हव्यात याविषयी परिषदेत आंतरराष्ट्रीय तज्ञांनी सुचविलेल्या उपाययोजनांचा अंतर्भाव करून एक श्वेतपत्रिका शासनाला सादर केली जाणार आहे. एमएमआरडीए, एमएसआरडीसी, मुंबई महानगरपालिका, वॉटर रेग्युलेटरी अॅथोरिटी या यंत्रणांसोबतच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणानेही या परिषदेला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. पालिका आयुक्त अजोय मेहता, एमएमआरडीए आयुक्त आर.ए.राजीव, एमएसआरडीसीचे संचालक राधेश्याम मोपलवार, नगरविकास सचिव मनीषा म्हैसकर- पाटणकर यांसह विविध देशांचे राजदूत, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तज्ञ मंडळी या परिषदेला उपस्थित राहणार आहे.

आंतरराष्ट्रीय शहर अशी ख्याती असलेल्या मुंबईला उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी सर्वच सरकारी यंत्रणा आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. तरीही मुंबईत गेल्या अनेक वर्षांपासून अनेक समस्या आहेत. मुंबईतील खासदार या नात्याने या समस्यांवरील उपाय शोधून या शहरवासीयांना दिलासा देण्यासाठीच या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. – राहुल शेवाळे, खासदार